म्हसवड : पाचशे, हजारांच्या नोटा बँकेस द्या व त्याच्या बदलीत पाचशे रुपयांची, दहा रुपयांची नाणी घेऊन जा, अशी अभिनव योजना म्हसवड येथील माणदेशी महिला सहकारी बँकेने राबविली. आठवडा बाजार दिवशी राबविलेल्या या योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चांगलीच उभारी आली आहे.केंद्र सरकारने चलनातून रद्द केलेल्या पाचशे, एक हजारांच्या नोटा जमा करून त्या बदलीत नवीन नोटा देण्याची सुविधा विविध बँकांतून केलेली आहे. चलनात नवीन आलेल्या दोन हजारांच्या नोटा प्रत्यक्ष व्यवहारात वापरताना सुटे करताना नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यामुळे प्रत्येकी दहा रुपयांची पन्नास नाणी बँकेच्या माध्यमाने ग्राहकांना केवायसी पाहून आठवडा बाजारा दिवशी उपलब्ध करून बँकेने सर्वसामान्यांची सुट्या पैशांअभावी होणारी ससेहोलपट काहीअंशी थांबवण्यात यश मिळविले आहे.गेल्या आठवडा बाजारात अनेक नागरिकांना पाचशे व हजारांच्या नोटा असल्याने बाजारहाट करताना व्यापाऱ्यांनी त्या नोटा घेण्यास असमर्थता दाखवल्याने खरेदी-विक्री न करता रिकामी पिशवी घेऊन घरी परतावे लागले होते. नागरिकांची होणारी ही अडचण ओळखून माणदेशी बँकेने बुधवार आठवडा बाजारादिवशी बाजारतळावरच सुटे पैसे उपलब्ध करून दिल्याने नागरिकांच्यातून बँकेच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.चलनातून हजार, पाचशेच्या नोटा रद्द झाल्या आहेत. त्या बदलण्यासाठी बँकेच्या दारात तासन्तास उभे राहावे लागत आहे. तसेच बाजारपेठेत जुन्या नोटा चालत नसल्याने चलनातील नोटा मिळविण्यासाठीही दिवसभर बँकेत थांबावे लागते. शहराील बहुसंख्य एटीएम बंद आहेत. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांचे हाल होत असल्याने अर्थव्यवस्था कोलमडली असताना माणदेशी बँकेने घेतलेल्या अनोख्या उपक्रमामुळे माणदेशी माणसाला कसलाही फटका बसलेला नाही. त्यामुळे माण तालुक्यातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)बँकेचा सभासद नसला तरी योजनेचा लाभ२,३०० ग्राहकांना पुरतील एवढीच दहा रुपयांची नाणी उपलब्ध झाली आहेत. म्हसवडच्या आठवडे बाजारात सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याकडील ‘केवायसी’ पाहून सुटे पैसे उपलब्ध करून दिले आहेत. गोंदवले येथील आठवडा बाजारात दहा रुपयांची नाणी उपलब्ध करून देणार असून, तो नागरिक आमच्या बँकेचा खातेदार नसला तरी केवायसी पाहून सुटे नाणी देण्यात येणार आहे, अशी माहिती माणदेशी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी यांनी दिली.
पाचशेच्या जुन्या नोटा द्या; दहाचे ठोकळे न्या!
By admin | Published: November 17, 2016 10:25 PM