फलटण : साखरधंद्यात स्पर्धा वाढली असून दर देण्यासाठी कारखानदार कर्ज काढत आहे, ही वस्तुस्थिती असली तरी केंद्र सरकारने साखर निर्यातीचा निर्णय घेताना पोत्यामागे एक हजार अनुदान दिले तरच ऊस उत्पादकांना दर देता येईल व कारखाने टिकतील. केंद्र सरकारने आतापर्यंत जी कारखान्यांना मदत केली ती एका हाताने करताना दुसऱ्या हाताने कर्जाची वसुलीही केली आहे. केंद्रसरकारने कारखान्यांना पाच वर्षांच्या बोलीवर बिनव्याजी कर्ज द्यावे व त्यानंतर व्याज लावावे अशी मागणी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केली.साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स लि. साखरवाडी या कारखान्याच्या ८३ व्या बॉयलर अग्नीप्रदीपन खा. मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आ. डॉ. कृष्णचंद्र भोईटे, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, मुंबई मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष डॉ. विजयराव बोरावके, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, कारखान्याचे चेअरमन प्रल्हादराव साळुंखे-पाटील, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील आदी उपस्थित होते.खा. मोहिते-पाटील म्हणाले, सध्या साखर कारखानदारी साखरेचे दर कोसळल्याने खूप अडचणीत आली आहे. ‘एफआरपी’चाही दर कारखानदार देऊ शकत नाही ही सद्य:परिस्थिती आहे. शरद पवार हे कृषिमंत्री असताना साखरेला भावही होता आणि त्यामुळे ऊस उत्पादकांना चांगला दरही देता येत होता. साखर निर्यात करताना पोत्यामागे एक हजार अनुदान दिल्यास परिस्थिती सुधारणार आहे. ते पुढे म्हणाले, न्यू फलटण शुगर वर्क्स सध्या अडचणीत असला तरी प्रल्हादराव पाटील यांच्या कल्पक नेतृत्त्वामुळे तो अडचणीतून बाहेर येईलच; पण एफआरपी एवढा दर देण्यातही आघाडीवर राहील.न्यू फलटण शुगर वर्क्सने ‘एफआरपी’प्रमाणे २१०० रुपये दर द्यायचे आहे. यापूर्वी १,८०० रुपये दर आपण दिला असून बँकांकडे कर्जासंदर्भातील प्रस्ताव मान्य होताच उरलेले ३०० रुपये देऊ. या हंगामात चार हजार मे. टनाने ६ लाख मे. टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रल्हादराव पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी खा. हिंदुराव नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर, डॉ. विजय बोरावके, सुभाषराव शिंदे यांची भाषणे झाली. यावेळी शेतकरी सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रल्हादराव पाटील देशात एकमेव व्यक्ती साखर कारखान्याचे चेअरमनपद सांभाळताना कामगार युनियनचेही अध्यक्षपद सांभाळणारे प्रल्हादराव पाटील हे देशातील एकमेव व्यक्ती आहे. त्यांना ही कला कशी जमते असा सवाल मोहिते-पाटील यांनी करताच हशा पिकला.
कारखान्यांना पाच वर्षे बिनव्याजी कर्ज द्या
By admin | Published: September 25, 2015 10:29 PM