सातारा : ‘खरिप हंगाम सुरू होणार असून, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करणाऱ्या कृषी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात यावे,’ अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, यावर्षीच्या खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी ग्रामपातळीवर काम करत आहेत. कामाच्या स्वरूपामुळे त्यांना प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर कामे करावी लागत आहेत. गावपातळीवर प्रामुख्याने कृषी सहायक कामे करत असून, खरीप हंगाम यशस्वी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. हे काम करत असताना त्यांना कोणतेही विमा संरक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्याच्या कोरोना काळात आरोग्याच्या दृष्टीने अनुचित घटना घडल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण देण्यात आले नाही. यामुळे राज्य कृषी सहायक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे, त्यामुळे त्यांना विमा कवच देण्याची गरज आहे.