सणबूर : ताईगडेवाडी-तळमावले (ता. पाटण) येथे दारूबंदीसाठी महिलांनी आपला लढा सुरुच ठेवला आहे. यासाठी मतदानही घेण्यात आले; मात्र त्याचा निकाल एक वर्ष झाले तरीही जाहीर केलेला नाही, ही बाब गंभीर असून, हा निकाल त्वरित जाहीर करुन महिलांना न्याय द्यावा, यासाठी महिला दिनी उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधल्याचे सामाजिक कार्यकर्त्या कविता कचरे यांनी सांगितले.
कविता कचरे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तळमावले येथील दारूचे दुकान बंद करण्यासाठी २६ फेब्रुवारी २०२० रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या घटनेला एक वर्षे होऊन गेले, तरीही त्याचा निकाल प्रशासनाने जाहीर केलेला नाही. त्यामुळे गावात अजूनही बाटली उभी असून, त्याचा त्रास सर्वसामान्य कष्टकरी जनतेला सहन करावा लागत आहे. याबाबत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनही योग्य ती कार्यवाही झाली नाही. यामुळे तळमावले येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. महिलांनी एक दिवस उपोषणाला बसून प्रशासनाचा निषेध केला आहे. दारूबंदी व झालेली मतदान प्रक्रिया याबाबतचे निवेदन महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे. या मतदान प्रक्रियेविषयी व प्रशासनाच्या भूमिकेबद्दल आम्हाला शंका असल्याचे या महिलांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. या उपोषणात सीताई फाऊंडेशनच्या अध्यक्षा कविता कचरे यांच्यासह सुजाता ताईगडे, सुमन ताईगडे, इंदूताई शिबे, संगीता ताईगडे, शालन ताईगडे, रूपाली ताईगडे, मालन ताईगडे, सुमन ताईगडे व महिला सहभागी झाल्या होत्या.