नशीर शिकलगार
फलटण : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी सुरवडी (फलटण) येथील कमिन्स या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सामावून घ्या, या प्रमुख मागणीसाठी आज गुरुवारी (दि.९) सकाळ पासूनच कमिन्स कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरवडी येथील ग्रामस्थ व तरुणांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.सुरवडी (ता-फलटण) येथे कमिन्स ही बहुराष्ट्रीय कंपनी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला जागा उपलब्ध करत असताना सुरवडी येथील ग्रामस्थांनी जागा देऊनही आज पर्यंत या कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना आजही नोकरीत सामावून घेतले नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.26 जानेवारी 2023 रोजी ग्रामसभेमध्ये कमिन्स कंपनीने तात्काळ स्थानिकांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावयाचा ठराव करीत कमिन्स कंपनीच्या प्रशासनाला या संबंधित माहिती दिली होती. फेब्रुवारी 2023 अखेर पण याविषयी आपण योग्य तो निर्णय घेऊ असे कंपनीने कळविले होते. मात्र अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने हे आंदोलन केल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.