यासंदर्भात खासदार श्रीनिवास पाटील यांनी पत्र लिहिले असून, त्यात म्हटले आहे की, सध्या कोकणच्या दिशेला जाण्यासाठी कऱ्हाड किंवा उंब्रज ते पाटण हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावर काही अडथळा निर्माण झाल्यावर अथवा अतिवृष्टीमध्ये या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागतो. त्याला समांतर पर्यायी मार्ग नसल्याने या मार्गावरून जाणाऱ्यांची मोठी अडचण होते. कऱ्हाड-ढेबेवाडी या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ढेबेवाडीपर्यंत पूर्ण झाले आहे; मात्र या मार्गाची नोंद प्रमुख जिल्हा मार्ग ५५ अशी आहे. या रस्त्याला राज्यमार्गाचा दर्जा देऊन सुधारणा कराव्यात. पुणे-बेंगलोर महामार्गाच्या वाखाण वस्तीपासून सुरू झालेला कऱ्हाड ते ढेबेवाडी हा मार्ग ढेबेवाडीपासून पुढे सणबूर, महिंद, सळवे, पाळशी, लेंढोरी, कुसरुंड, नाटोशी, मोरगिरी ते संगमनगर धक्का असा राज्यमार्ग प्रस्तावित करावा. हा मार्ग झाल्याने कऱ्हाडपासून ढेबेवाडीपर्यंतचा सर्व भाग कोयना विभागाला जोडला जाईल, तसेच पर्यटनाची वाढ मोठ्या प्रमाणात होईल. ढेबेवाडी विभागाला कोकणात जाण्यासाठी जवळचा व जलद मार्ग निर्माण होईल. अतिवृष्टीमध्ये कऱ्हाड-चिपळूण हा मार्ग काही वेळा बंद होतो, त्या काळात या मार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून उपयोग करता येईल.
- चौकट
प्रस्ताव सादर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
दरम्यान काढणे, ताईगडेवाडी, मानेगाव, करपेवाडी, कुंभारगाव, पाचुपतेवाडी, कुठरे, मोरेवाडी, सणबूर, सळवे, महिंद, ढेबेवाडी, बनपुरी जानुगडेवाडी, मान्याचीवाडी, मालदन, गुढे, भोसगाव, रुवले, कारळे, तामिणे, पाळशी, अंबवडे, पाणेरी, रुवले, उधवणे, मराठवाडी आदी गावातील ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे तशी मागणी केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुनगिलवार व अन्य अधिकाऱ्यांची सातारा येथे बैठक घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही खासदार श्रीनिवास पाटील यांनी यापूर्वी केल्या आहेत.