सातारा : लोकसभा निवडणुकीची राष्ट्रीय काँग्रेसनेही जोरदार तयारी केली असून साताऱ्यात सांगली, कोल्हापूरसह तीन जिल्ह्याची आढावा बैठक झाली. यामध्ये विधानसभा निरीक्षक आणि तालुकाध्यक्षांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलून काँग्रेस विचाराचा उमेदवार द्यावा. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची राहील, अशी आग्रही मागणी केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे निवडणुकीसाठी काँग्रेस पूर्ण तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने आणि माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील आणि विश्वीजत कदम यांच्या सूचनेवरुन विधानसभा मतदारसंघ प्रभारींची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशा सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील निरीक्षक आणि तालुकाध्यक्षांची महत्वपूर्ण बैठक सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत झाली. अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव सोनलबेन पटेल यांनी आढावा घेतला. यावेळी ही मागणी करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत. भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. तसेच राज्यात महायुतीनेही कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे दौरे सुरु आहेत. असे असतानाच आता राष्ट्रीय काँग्रेसेही रणशिंग फुंकले आहे. बैठका, पक्षप्रवेश, कार्यक्रम आदींवर भर दिला आहे. त्यातूनच साताऱ्यात काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत तीनही जिल्ह्यातील विधानसभा निरीक्षक, तालुकाध्यक्षांकडून लोकसभा मतदार संघ आणि विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.गावागावांत काँग्रेस विचाराचे लोक आहेत. साताऱ्यात काँग्रेसचा एक आमदार, सांगलीत दोन तर कोल्हापुरात चार आमदार आहेत. तसेच कोल्हापुरातच विधान परिषदेचे दोन सदस्य आहेत. त्यामुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विचाराचा उमेदवार द्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच त्या उमेदवाराच्या विजयाचही जबाबदारी घेण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला. यावर सोनलबेन पटेल यांनी आढावा बैठकीचा अहवाल वरिष्ठस्तरावर पाठवला जाईल, असे सांगितले.
अहवाल आठ दिवसांत द्या..साताऱ्यातील बैठकीत पक्षाच्या सचिव सोनलबेन पटेल यांनी प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र आढावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना सूचनाही केली. तर पंचायत समितीस्तरावर तत्काळ बैठक घेऊन त्यांचा अहवाल जिल्हाध्यक्षांना आठ दिवसात सादर करावा. पक्षवाढीसाठी पुढाकार घ्या. ज्या कमिट्या, सेल अपूर्ण आहेत. ते तत्काळ पूर्ण करावेत, अशी सूचनाही यावेळी त्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.