कुकुडवाड : माण-खटाव तालुक्यांतील कुकुडवाड, विखळे, कलेढोण, मायणी, पुकळेवाडी, विरळीसह भागाला कायम दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी टेंभू जलसिंचन योजनेचे आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे, नाहीतर आगामी काळातील निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार, असा एल्गार कुकुडवाड येथील पाणी परिषदेत टेंभू जलसिंचन योजनेतून वंचित राहिलेल्या गावांतील ग्रामस्थांनी केला. तसेच शासनाला आमच्या हक्काचे पाणी द्यायला लोकचळवळीच्या माध्यमातून भाग पाडू, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला.माण-खटाव तालुक्यांतील एकूण ३२ गावांतील ग्रामस्थ एकत्र येत दुष्काळावर मात करण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून पाण्यासाठी लोकचळवळ उभी केली आहे. टेंभूचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी शेतकऱ्यांना मिळावे. त्यातून या परिसरातील शेतकºयांच्या दुष्काळी परिस्थितीत ढासळलेल्या वार्षिक आर्थिक उत्पन्नाला व उत्पादनाला कुठं तरी सावरता येईल, यासाठी सर्वसामान्यांना हा लढा उभारण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत शेतकºयांना सावरण्यासाठी टेंभू जलसिंचन योजनेचे पाणी परिसरातील शेतकºयांच्या शिवारात पोहोचणे गरजेचे आहे. तसेच टेंभू पाणी योजनेचा जोपर्यंत लाभ येथील शेतकºयांना मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी पाणी न मिळाल्यास आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा ठाम निर्धार कुकुडवाड, पुकळेवाडी, विरळी, कलेढोण, विखळे, पाचवडसह परिसरातील लोकांनी एकत्र येऊन पाणी परिषदेत केला आहे. आमच्या हक्काचे पाणी जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत पाण्यासाठीचा लढा व लोकचळवळ अशीच चालू ठेवण्याचा निर्धारही पाणी परिषदेत केला.कुकुडवाड परिसरात पाणी उशाला; पण कोरड घशाला, अशी स्थिती झाली आहे. टेंभू जलसिंचन योजनेचे पाणी सांगली भागातील शिवारात पोहोचले आहे. उरमोडी जलसिंचन योजनेचे पाणी कुकुडवाड गावच्या खालच्या बाजूने गेले असून, त्याचा कोणताच उपयोग येथील शेतकºयांना होत नाही. तेच आमच्या हक्काचे पाणी आम्हाला द्यावे. ‘आता नाही तर कधीच नाही,’ असा नारा देत पाण्याच्या संघर्षाला सुरुवात केली आहे. तहानलेल्या दुष्काळी भागातील लोकांची कायमस्वरुपी तहान कधी भागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चळवळीच्या माध्यमातून परिसराला कायमचे टँकरमुक्त करायचे आहे. या परिषदेमध्ये आ. जयकुमार गोरे, निवृत्त कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष अनिल देसाई, पंचायत समितीचे सदस्य तानाजी काटकर, तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच, अनेक मान्यवर उपस्थित होते.
पाणी द्या, अन्यथा मतदानावर बहिष्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:48 PM