सातारा : देशात सत्ता असणाऱ्यांना लोकांविषयी आस्था नाही. राज्यातील सरकार तुमचे दुखणे कसे वाढेल हेच पाहत आहे. त्यांना दुसऱ्याचा पक्ष फोडण्यात धन्यता वाटत आहे. या विरोधात एकजूट अन् शक्तीने उभे राहून त्यांना धडा शिकवूया, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेत केले. तर पत्रकारांशी बोलताना पहाटेच्या शपथविधीनंतर एकदा संधी दिली होती. संधी सारखी मागायची अन् द्यायचीही नसते असे असे स्पष्ट करत त्यांनी अजित पवार यांना आता संधी नसल्याचा इशाराच दिला आहे.
दहिवडी येथील बाजार पटांगणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुभाषराव शिंदे, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप, सारंग पाटील, मनोज पोळ, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रा. विश्वंभर बाबर आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले राज्यात पावसाची दडी आहे. दुबार पेरणी करावी लागेल. शासनाकडून तुम्हा शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी आम्ही आलो आहोत. खरा प्रश्न पाण्याचा आहे. येथील लोकांनी मला लोकसभेत पाठवले. या मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांनी केले. हा मानदेश कायम चव्हाण साहेबांच्या पाठीशी उभा राहिला. तर चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादामुळे मी राज्याचा चारवेळा मुख्यमंत्री राहिलो. पण राज्यातील आजची स्थिती वेगळी आहे. सत्ताधाऱ्यांना दुष्काळाविषयी आस्था नाही. दुष्काळामुळे यवतमाळ जिल्ह्यात १५ दिवसात २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. चारा नाही, पाणी नाही. बँक कर्ज वसुलीच्या नोटीस येत आहेत. शेतकरी आत्महत्या करतात हे महाराष्ट्रातील चित्र चांगले नाही. केंद्राने कांदा निर्यात ४० टक्के कर बसवला. एवढा कर कधी नव्हता. आताचे सरकार शेतकरी विरोधी आहे.