दहिवडी : ‘माण तालुक्यात लोकसहभागाची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली. ही चळवळ संपूर्ण राज्याला दिशा देणारी आहे’, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी काढले.
दहिवडी येथील प्रांत कार्यालयाच्या प्रागणात आयोजित केलेल्या माण-खटाव वसुंधरा समृद्ध गाव योजनेत निवड झालेली २९ गावे व जलदुतांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार जयकुमार गोरे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, खटावचे प्रांताधिकारी जनार्दन कासार, डाॅ. माधवराव पोळ, नगराध्यक्ष धनाजी जाधव, पाणी फाऊंडेशनचे आबा लाड, अजित पवार, बलवंत पाटील, नंदकुमार खोत, सुनील पोळ, सिद्धार्थ गुंडगे, संदीप खाडे उपस्थित होते.
गौडा म्हणाले, ‘माण तालुक्याच्या मातीत श्रमदानाची चळवळ रुजली आहे. येथील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या एकजुटीमुळे तालुक्यातील गावांनी वॉटरकप स्पर्धेत बक्षीस पटकावले. समृध्द गाव स्पर्धेतही ही गावे चमकतील.’
आमदार गोरे म्हणाले, ‘माणमध्ये बाहेरून पाणी आणले. मोठ्या प्रमाणात पाणी अडवले; पण आपण पाटाने पाणी देतो, हे खूप वेदनादायी आहे. यापुढे पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे तरच याचा उपयोग आहे. सर्व राजकारण्यांना एकत्र आणण्याचे काम या चळवळीने केले. यापुढेही या चळवळीला राजकीय वास येऊ देऊ नका.’
प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘माण तालुक्यातील अनेक गावांनी या योजनेत सहभाग घेतला. आजही समृद्ध गाव योजनेत सर्वात जास्त गावे माण तालुक्यातील आहेत. या चळवळीने खूप काही दिले. वॉटरकप स्पर्धेत समृध्द गाव योजनेचा पहिला टप्पा २९ गावांनी पूर्ण केला. यापुढील प्रवास खडतर आहे. त्यामुळे सर्वांनी गाव पातळीवर नियोजन करावे, प्रत्येक कुटुंब समृद्ध व्हावे, यासाठी प्रयत्न व्हावा.’
यावेळी समृध्द योजनेतील १२०पैकी ७० गुण मिळवून दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केलेल्या २९ गावांचा, त्याचबरोबर योगदान देणाऱ्या जलदुतांचा सत्कार करण्यात आला. पाणी फाऊंडेशनच्यावतीने ननावरे, आबा लाड, अजित पवार यांनी मनोगत व्यक्त केले. काही गावांच्या सरपंचांनी मनोगत व्यक्त केले.
चौकट..
अन् एकच हशा पिकला...
डाॅ. पालवे यांनी माण-खटाव वसुंधराची कल्पना मांडताना राजकीय नेत्यांना सहकार्य करा, असे आवाहन केले. त्यावेळी पहिल्या ओळीत नेते तर दुसऱ्या ओळीत वसुंधराचे कार्यकर्ते होते, हे लक्षात येताच प्रांत म्हणाले, ‘पहिली ओळ नको, दुसरी ओळ करेल,’ त्यामुळे एकच हशा फिकला.
२१ दहिवडी
फोटो- दहिवडी (ता. माण) येथे समृध्द गाव स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण केलेल्या गावांना विनय गौडा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार जयकुमार गोरे, सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी उपस्थित होते. (छाया : नवनाथ जगदाळे)