सातारा : गुरुपौर्णिमेनिमित्त येत्या शनिवारी (एक आॅगस्ट) ‘लोकमत’ आणि आदर्श ग्रुपने शिक्षकांना अनोखी भेट देण्याचे ठरविले आहे. या दिवशी दुपारी चार वाजता जिल्हा बँकेच्या सभागृहात ‘भूपाळी ते भैरवी’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. शिक्षकांनी शिक्षकांसाठी तयार केलेला कार्यक्रम, हे याचे वैशिष्ट्य आहे.गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांचा संगम साधून सातारा जिल्ह्याच्या बांधकाम क्षेत्रात प्रथमच ‘आयएसओ’ मानांकन मिळविणाऱ्या आदर्श ग्रुपकडे या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व आहे. ‘भैरवी ते भूपाळी’ हा मराठमोळ्या लोककलांवर आधारित बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम असून, संगीत आणि नृत्याचा हा एक ढंगदार, अविस्मरणीय सोहळा ठरणार आहे. शाळा ही समाजाची प्रतिकृती आहे. तसा समाजही असायला हवा, या एकाच ध्येयाने ज्ञानाचा वसा घेऊन आजन्म विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य शिक्षक करतात. शिक्षकांप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेतून ‘लोकमत’ने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून एक निवांत संध्याकाळ गुरुजींसाठी संगीताने सुंदर करण्याचे ठरविले. शैक्षणिक वर्षात नव्या दमाने सज्ज होण्यासाठी आणि प्रफुल्लित मनाने ज्ञानदानाचे पवित्र कार्य सिद्धीस नेण्यासाठी ‘लोकमत’चा हा छोटासा प्रयत्न आहे. सर्व शाळांतील गुरुजनांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे करण्यात आले आहे. प्रत्येक शिक्षकासोबत घरातील एका व्यक्तीस कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास कुल्लाळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, आदर्श ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील धुमाळ, उपाध्यक्ष सुधाकर अनपट, सचिव विक्रम बोराटे, सरव्यवस्थापक विजयकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. या अस्सल मराठमोळ्या बहारदार कलाविष्कार याचि डोळा याचि देही अनुभवण्यासाठी गुरुजनांनी उपस्थित राहून या कार्यक्रमचा आनंद घ्यावा. अधिक माहितीसाठी ९८५०४२६६११, ९५५२५०१७९२ व ९७६२५२७१०९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी) मराठमोळा रांगडा कलाविष्कार...या कार्यक्रमात ओवी, पिंगळा जोशी, हेळवी, वासुदेव, कडकलक्ष्मी, बहुरूपी, भारूड, शाहिरी, गवळण, नंदीबैल, वाघ्या-मुरळी, बतावणी गीते, मोटेवरची गाणी, पोतराज, कोळी नृत्य, धनगरी ओव्या, आदिवासी नृत्य, लावणी, एकात्मतेची नाळ जोडणारी भैरवी असे एकाहून एक सरस आविष्कार सादर होणार आहेत.
ज्ञानदात्यांचा गौरव स्वरालंकारांनी!
By admin | Published: July 28, 2015 11:26 PM