कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील पोतले येथे भर वस्तीमधील जनावरांच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने हल्ला केला. यामध्ये शेळीचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वनविभागाकडे केली आहे.
पोतले येथील पाटील मळा परिसरात भर वस्तीमध्ये संभाजी शामराव पाटील यांच्या घरासमोरच त्यांचे जनावरांचे शेड आहे. शेडमध्ये शेळीसह लहान दोन बकऱ्या बांधण्यात आल्या होत्या. शेडच्या पाठीमागील बाजूस उसाचे क्षेत्र आहे. या उसाच्या शेतातून रात्री दीडच्या सुमारास बिबट्याने अर्ध बांधलेल्या खिडकीतून शेडमध्ये प्रवेश केला. यावेळी खिडकीजवळ बांधलेल्या शेळीवर हल्ला करून ठार मारले. त्यानंतर शेळीला घेऊन खिडकीतून बाहेर उसाच्या शेतात उडी मारली. मात्र शेळीला बांधण्यात आलेली दोरी मजबूत असल्याने शेळी शेडच्या बाहेरील बाजूस लटकून राहिली. यावेळी बिबट्याने शेळीच्या पोटाखालील काही भाग खाऊन पलायन केले.
पाटील हे रविवारी सकाळी जनावरांच्या शेडमध्ये गेले असता त्यांना शेडमध्ये शेळी दिसून आली नाही. मात्र शेळी बांधलेली दोरी खिडकीवर लटकताना दिसली. जवळ जाऊन पाहिले असता शेळी शेडच्या पाठीमागील बाजूस अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत मरून लटकत असल्याचे निदर्शनास आले. बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याचा कयास झाला.