कोपर्डे हवेली : पदवीपर्यंतचे शिक्षण झाले की, युवक नोकरीच्या शोधात फिरतात. नोकरी मिळाली तर ठिक नाही तर ते शेतीकडे वळतात. मात्र, तीन पदवीधर युवकांनी नोकरी व शेती करतच शेळीपालनाचा एक पूरक व्यवसाय उभा केला आहे. पाच लाखांची गुंतवणूक करून हे युवक शेळीपालन करीत आहेत. शिरवडे येथील मिलिंद पाटील, गोवारेचे पंकज पाटील तर मुंढे येथील सागर माने हे तिन्ही युवकांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. या तिघांना एका खासगी फर्ममध्ये नोकरीही मिळाली आहे. मात्र, फक्त नोकरीवर विसंबून न राहता स्वत:चा व्यवसाय उभा करण्याचा निर्णय या तिघांनी घेतला. मात्र, व्यवसाय कोणता निवडावा याबाबत त्यांच्यात एकमत नव्हते. अखेर चर्चेतून त्यांनी शेळीपालन व्यवसायाची निवड केली. त्यासाठी शिरवडे येथे त्यांनी दहा गुंठे जागेत ६० फूट लांब व १६ फूट रुंदीच शेड उभे केले. तर मोकळ्या जागेमध्ये चारी बाजंने कंपाऊंड घेतले. त्यासाठी सुरुवातीला पाच लाखांचे त्यांनी भाग भांडवल उभे केले. त्यातून शेड, विंधनविहीर, साध्या शेळ्या व पैसास करण्यासाठी ९० हजारांचा आफ्रिकन जातीचा बोकडही त्यांनी खरेदी केला. सहा महिने लागणारे खाद्य आणून ठेवले. शेजारील पाच गुंठे जागेमध्ये घास गवत, बाजरी, शेवरी आदीची पेरणी केली. १५ महिन्यांच्या कालावधीमध्ये शेळ्यांपासून मिळालेल्या ३० संकरित करडांची विक्री करण्यात आली. काही शेळीपालन करणाऱ्यांनी आफ्रिकन बोकड ५०० ते ७०० रुपये किलोवर खरेदी केले आहेत. सकाळचे दोन तास आणि संध्याकाळी एक तास शेळ्या फिरविण्यासाठी नेल्या जातात. बाकीचा वेळ शेळ्या बंदिस्त असतात.आफ्रिकन बोर बोकड जातीपासून होणाऱ्या बकरी पैदासीचे वजन चार महिन्यांमध्ये २५ ते ३० किलोपर्यंत मिळत आहे. सकाळ आणि संध्याकाळी या पैदास झालेल्या बकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा खुराक देण्यात येतो. त्यामध्ये मका, बाजरी, पेंड आदी प्रकारचे खाद्य देण्यात येते. (वार्ताहर) चाऱ्याची बचत; शेळीही निरोगीमुक्त आणि बंदिस्त शेळीपालनाचा मध्य साधून हा व्यवसाय उभा करण्यात आला आहे. शेळ्या सकाळी व सायंकाळी शेडमधून बाहेर काढल्या जात असल्याने त्यांना पोषक वातावरण मिळते. परिणामी, रोगांचे प्रमाण अल्प असून, चाऱ्याची बचत होते. शिवाय शेळ्याही निरोगी राहतात. ‘आफ्रिकन बोर’ जातीच्या बोकडाचे वजन जादा असल्याने पैसे चांगले मिळतात. आवश्यकतेवेळी करडांची विक्री करून आर्थिक नियोजन करता येते. माझा पूर्वी फिरता शेळी पालनाचा व्यवसाय होता. त्यामुळे याठिकाणी मी नोकरी करत आहे. आफ्रिकन बोर जातीच्या बोकडाची पैदास सुरू झाली असून, पिल्लांचे कमी कालावधीमध्येच चांगले वजन मिळत आहे. शेड व वजन यावर पिल्लांची विक्री होत असते. - संतोष पडळकर, शेळीपालन कर्मचारी शेळीपालन व्यवसाय फायद्याचा आहे. संकरित केलेल्या पिल्लांना चांगले वजन मिळते तर काही शेतकरी पैदास करण्यासाठी किलोवर बोकड विकत घेऊन जातात. - पंकज पाटील, मालक
पदवीधर युवक पाळताहेत शेळ्या!
By admin | Published: August 03, 2015 9:51 PM