वडूज : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने त्सुनामीचे रूप घेतले असून, जनतेसह शासन या महामारीपुढे हतबल होताना दिसून येत आहे. तर या लाटेत बाधितांची संख्या वाढत असल्याने कोविड सेंटरमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर आदी सुविधांची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत कोरोना बाधिताला उपचारासाठी त्यांचे कुटुंबीय कोरोना सेंटरसह इतर ठिकाणी बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळतेय का, यासाठी धडपडत आहेत.
बाधितांची संख्या जास्त व बेडची संख्या पाहता, यात मोठी तफावत जाणवत असल्याने बेड मिळत नाहीत. यात शेवटचा पर्याय म्हणून बाधितांचे कुटुंबीय आपण ज्यांना प्रत्येक निवडणुकीत मतदान करतो, त्यांच्याकडे जाऊन बेड मिळविण्यासाठी वशिला लावण्याचा प्रयत्न स्थानिक नेतेमंडळी, लोकप्रतिनीधी, नेते, पदाधिकाऱ्यांकडे करत आहेत. मात्र, वाढते रुग्ण व कमी पडणारे बेड यामुळे नेतेमंडळीही हताश झाले असून, या संकटात रुग्णांसाठी आपल्याकडे शब्द टाकणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना व जनतेला काय उत्तर द्यायचे, हा प्रश्न त्यांनादेखील पडत आहे. त्यामुळे नेतेमंडळींची चांगलीच गोची झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या या लाटेत बाधितांना कशीबशी बेडची व्यवस्था झाली, तर ऑक्सिजन बेड मिळत नाही, व्हेंटिलेटर मिळत नाही, इंजेक्शन मिळत नाही, अशा परिस्थितीत काय करायचे? हा मोठा प्रश्न सर्वांसमोरच उभा राहिला आहे. खटाव-माण तालुक्यांतील बाधितांसाठी बेड मिळत नाही म्हटल्यावर तो मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक स्थानिक नेत्यांसह गण, गट, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरील नेतेमंडळींकडे वशिला लावून बेडसाठी धडपड करत आहेत. थोड्याफार रुग्णांना नेतेमंडळी मदत करताना दिसून येत आहेत. मात्र वाढत्या रुग्ण संख्येमुळे बाधितांसाठी बेडची बिकट अवस्था सुरू आहे. अशा परिस्थितीत बेड मागण्यासाठी संपर्क करणाऱ्यांना काय उत्तर द्यायचे, या विवंचनेत ते दिसून येत आहेत. नेत्यांनी बेड उपलब्ध नाही असे सांगणे म्हणजे समोरच्यांना राग येणे स्वाभाविक. मग तो आपल्यापासून तुटणार, त्याच्याबरोबर स्थानिक पुढाऱ्यांचे आपण काम केले नाही म्हणून तो नाराज होणार. या परिस्थितीत काय करायचे? अशा द्विधावस्थेत नेतेमंडळी अडकले आहेत. कोरोनाच्या या महामारीत सर्वांना बेड उपलब्ध होऊन वेळेवर उपचार मिळून रूग्ण लवकर बरे व्हावेत, या मानसिकतेत सर्वच नेतेमंडळी आहेत.
(चौकट)
प्रत्येक तालुक्यात जम्बो कोविड सेंटरची गरज
सर्वच मोठे पक्ष आर्थिकदृष्ट्या सुदृढ आहेत. प्रत्येक पक्षाने तालुक्यात जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू करून आपापल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना म्हणजे आपल्याला मतदान करणाऱ्यांपैकी कोणी कोरोनाबाधित असेल, तर त्यांना बेड व इतर सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्यावर गरजेनुसार उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले, तर कोणाचाच या महामारीत बळी जाणार नाही. ही सूचक राजकीय पोस्ट खरी व्हावी, अशी वाटत असली तरी, कोणता पक्ष यासाठी पुढाकार घेणार, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
(चौकट)
पाच कोरोना सेंटरसाठी ५० लाखांचा निधी
कोरेगाव तालुक्यात आमदार महेश शिंदे हे कोविड सेंटर उभारून आपले कर्तव्य पार पाडत कौतुकास्पद कामगिरी करत आहेत. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही जिल्ह्यात पाच कोरोना सेंटरसाठी ५० लाखांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. अशा पद्धतीने सर्वच नेतेमंडळींनी कोविड सेंटरसाठी पुढाकार घेतला, तर कोरोना आवाक्यात येऊन जनतेला मोठा आधार मिळेल.
----------------------------------