म्हसवड : माण तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण शुक्रवार, दि. २९ जानेवारी रोजी माऊली मंगल कार्यालय दहिवडी येथे दुपारी १२ वाजता काढण्यात येणार आहे. आपल्या मनासारखे आरक्षण पडावे, यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत.
माणमधील ग्रामपंचायत निवडणूक मोठ्या चुरशीने पार पडली. ६१ ग्रामपंचायत निवडणुकांपैकी १४ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली, तर शिंदी खुर्द व राजवडीची निवडणूकसुद्धा बिनविरोध झाल्यातच जमा आहे. उर्वरित ठिकाणी स्थानिक गट,तट व सोयीनुसार पॅनल बनवून निवडणुका पार पडल्या. अपवाद वगळता अतिशय अटीतटीच्या लढती झाल्या. निकालानंतर दावे-प्रतिदावे करण्यात आले. या दाव्यांचा खरा कस सरपंच निवडणुकीत लागणार आहे.
काही बिनविरोध ग्रामपंचायतींसह निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींमधील सदस्य गावातून गायब झाले आहेत, तर काही भूमिगत झाले आहेत. काही ठिकाणी काठावरचे बहुमत आहे, तर काही ठिकाणी बहुमत आहे, पण आरक्षित जागेवरील उमेदवार विरोधकांकडे आहेत. त्यामुळे आपल्या मनासारखे आरक्षण पडावे, यासाठी प्रत्येक सदस्य व पॅनलप्रमुख प्रार्थना करत आहेत. आरक्षणाचा कौल कोणाला मिळतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरी आरक्षण सोडतीसाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार बी. एस. माने यांनी केले आहे.