सातारा : दहा दिवसांच्या धामधुमीनंतर विघ्नहर्त्या श्री गणेशाला रविवारी भाविकांकडून भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. ‘कोरोनाचे संकट दूर करून पुढच्या वर्षी लवकर ये’ असे साकडे ही भक्तांनी बाप्पाला घातले. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिक व गणेश मंडळांनी प्रतिसाद दिल्याने यंदाचा उत्सव शांततेत व निर्विघ्न पार पडला.
गणेशोत्सव सुरू झाल्यापासून घरोघरी उत्साहाला उधाण आले होते. कोरोनाचे संकट असल्याने सलग दुसऱ्या वर्षी भाविकांना बाप्पाचे स्वागत डामडौलात करता आले नाही. मात्र भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. यंदा कोठेही मोठे मंडप उभारण्यात आले नाही. देखावे साकारण्यात आले. डीजे वाजला नाही ना ढोल-ताशा कडाडला. तरीही भाविकांनी विघ्नहर्त्यांची दहा दिवस मनोभावे पूजा-अर्चा करून गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडला.
रविवारी अनंत चतुर्दशी दिवशी आपल्या लाडक्या गणरायाला भक्तांनी मंगलमय वातावरणात निरोप दिला. सातारा शहरातील जलतरण तलाव, हुतात्मा स्मारक, दगडी शाळा, कल्याणी शाळा व बुधवार नाका येथील कृत्रिम तळ्यांवर सकाळपासूनच भाविकांची मूर्ती विसर्जनासाठी रेलचेल सुरू होती. सायंकाळी चार नंतर गर्दी हळूहळू वाढू लागली; परंतु पालिका व पोलीस प्रशासनाने केलेल्या उत्तम नियोजनामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवता आले. बुधवार नाक्यावरील महायक तळ्यात क्रेनच्या साह्याने मूर्ती विसर्जन करण्यात आले. या ठिकाणी सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मानाच्या पाच गणपतींपैकी शेवटच्या शंकर पार्वती गणेश मूर्तीचे रात्री दहा वाजता विसर्जन झाले व साताऱ्याचा विसर्जन सोहळा शांत झाला.
(चौकट)
घरगुती विसर्जनाचा नवा अध्याय
विसर्जनावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा व पालिका प्रशासनाकडून नागरिकांना घरगुती बाप्पांचे घरीच विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा शहरासह जिल्ह्यातील हजारो भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे घरातच पिंप, बादली तर कोणी घराजवळील हौदात विसर्जन करून पर्यावरणपूरक उत्सवाचा नवा अध्याय सुरू केला.
(चौकट)
कडेकोट पोलीस बंदोबस्त
विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विसर्जनस्थळी, प्रमुख चौक तसेच मुख्य रस्त्यांवर पोलीस कर्मचारी तैनात होते. दरवर्षीप्रमाणे यंदाचा विसर्जन सोहळा पार पाडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
(चौकट)
शहरातील प्रमुख रस्ते बंद
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला होता. काही रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते. पोलीस दलाकडून पूर्व कल्पना देण्यात आल्याने भाविकांची गैरसोय झाली नाही.
फोटो : जावेद खान