सातारा : सातारा शहरात अतिक्रमणविरोधी मोहित वारंवार तिव्र केली जात आहे. त्यामुळे अनेकांची धावपळ सुरू झाली आहे. बडी मंडळी न्यायालयाचा दरवाजा ठोठावून ‘जैसे-थे’चा आदेश आणत आहेत. मात्र, एका महाशयाने चक्क स्वत: जागेत रात्रीत दगड ठेवून त्याला लिंबू, कूंकू आणि हार घालून ‘देवपण’ आणण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात ‘लोकमत’मधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधीत जागेतून तो दगडाचा ‘देव’ही रात्रीत अंतर्धान पावला.सरळमार्गी चालणारी मंडळी सर्व व्यवहार कायदेशीररित्या करुन स्वत:ची प्रगती करत असतात. मात्र, समाजातच काहीजण असेही आहेत की शासकीय जागेत अतिक्रमण करुन लहान-मोठे व्यावसाय करत आहेत. कित्येक वर्षे सरकारी जागेचा वापर करुन उदरनिर्वाह करत आहेत. प्रशासन जेव्हा अतिक्रमण विरोधी मोहिम राबविते. त्यावेळी हातची जागा जाऊच नये, म्हणून धडपड सुरू असते. अन् यासाठी माणूस कोणत्या थराला जाईल, याचा नेम नाही. याचाच प्रत्येय पुरोगामी सातारा शहरात पाहायला मिळाला.सातारा पालिकेने महिनाभरापूर्वी शहरामध्ये अतिक्रमण मोहीम राबविली. त्यावेळी त्या मोहिमेतील अधिकाऱ्यांना अनेक समस्या आल्या. कोणी कोर्टात धाव घेतली, कोणी जागेची कागदपत्रे दाखविली तर कोणी गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. मात्र, तरीही रडतखडत ही मोहीम आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत पार पडली; परंतु पुन्हा ही अतिक्रमण मोहीम सुरू होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले होते. तुळजाभवनी कॉम्प्लेक्सजवळ एक जुनी इमारत आहे. या इमारतीसमोर भिंतीलगत छोटासा निमुळता दगड आहे. दोन दिवसांपूर्वी रातोरात या दगडाचा चक्क ‘देव’ झाल्याचे सकाळी लोकांना पाहायला मिळाले. तेथून जाणारे लोकही त्या दगडाकडे कुतूहलाने पाहू लागले. हार, कुंकू, लिंबू त्या दगडावर वाहिला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राजधानी असलेल्या पुरोगामी सातारा शहरातील हे चित्र ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणल्यानंतर अज्ञातांनी दगडावरील कुंकू, फुले, लिंबे काढून टाकली. नंतर रात्रीत तो दगडही गायब केला. अंधश्रद्धेचा वटवृक्ष होण्यापूर्वीच ‘लोकमत’ने परखड भूमिका घेऊन त्या दगडाच्या देवाची कथा समाजासमोर आणल्याने अनेकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले. (प्रतिनिधी)दगडाच्या देवापुढे कुदळही थबकलीआपली जागा वाचावी, यासाठी राजवाडा परिसरातील कोण्या महाभागाने अंधश्रध्देचा आधार घेतला. दगडाला गुलाल लावून रातोरात देवालाही प्रकट केले. ‘अंनिस’ची राजधानी असलेल्या साताऱ्यात किमान प्रशासन याला भीक घालणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, घडलं निराळंच. दुसऱ्या दिवशी चर खोदणाऱ्या कामगारांची कुदळ या दगडाजवळ थबकली अन् देवाला वळसा घालून पुढे गेली.
अतिक्रमणातील ‘देव’ रात्रीत गायब!
By admin | Published: February 04, 2015 10:28 PM