लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : अनेक महिन्यांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या सातार्यातील गोडोली चौकाने शनिवारी मोकळा श्वास घेतला. सातारा पालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून रस्त्यावरील सर्व हातगाड्या व अतिक्रमणे हटविल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
सातारा शहरातील प्रमुख रस्ते असोत किंवा गल्लीबोळ सर्वत्र हातगाडीधारक, दुकानदार व छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा ठरत आहे.
त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार पालिकेच्या अतिक्रमण विभागाने गेल्या दोन दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे.
सातारा शहराच्या प्रवेशद्वारात असणाऱ्या गोडोली चौकात हातगाड्या, भाजी विक्रेते यांनी वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण केले आहे. सूचना देऊनही अतिक्रमण न हटविल्याने शनिवारी पालिका व पोलीस प्रशासनाने थेट कारवाईला सुरुवात केली. या कारवाईवेळी हॉकर्स संघटनेने किरकोळ आक्षेप घेतला. नुकसान न करता सबुरीने घेत ते हटवा, यावरून जिल्हा उपाध्यक्ष सादिक पैलवान, कार्याध्यक्ष संदीप माने, शहराध्यक्ष संजय पवार यांच्याशी कर्मचाऱ्यांचा शाब्दिक वाद झाला.
अतिक्रमणाचा प्रश्न सतत चिळघत असतो. पालिकेने ते हटविण्यासाठी मोहीम सुरू केली की फोनाफोनी होऊन ती थांबवली जाते. मात्र, अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी, सध्या वाहतुकीला अडथळा ठरणारे या चौकातील सर्व अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे सांगितले. तर हॉकर्स संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप माने यांनी, हॉकर्स झोन निश्चित करण्याचा न्यायालयाचा आदेश असूनही पालिकेने तो अद्याप केला नाही. हॉकर्स संघटनेला विश्वासात घेऊन कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्याऩ, प्रदीर्घ कालावधीनंतर गोडवली चौक वाहतुकीसाठी प्रशस्त झाल्याने वाहनधारकांनासह नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
फोटो ओळ :
साताऱ्यातील गोडोली चौक परिसरातील हातगाड्या शनिवारी सकाळी पालिकेच्या अतिक्रमण पथकाने पोलीस बंदोबस्तात हटविल्या.