पाटण : तालुक्याचा अतिदुर्गम भाग, डोंगराळ, जंगलात राहणारी माणसं, ओढे-नाले पार करून शाळेला जाणारी मुलं, रानटी जनावरांचे हल्ले पाचवीला पुजलेले, प्रसूती होणाऱ्या महिलांची गोेष्ट वेगळीच. एवढं सगळं घडूनही मोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घ्यायची झाले तर तिथे डॉक्टर नाहीत. केवळ एक परिचारिका आणि पुरुष कर्मचारी त्यामुळे या आरोग्य केंद्रात गंभीर रुग्णाला न्यायचं म्हणजे वेळ वाया जाऊन मृत्यूला कवटाळणं असं आहे. मात्र, बेदखल प्रतिनिधी व बिनधास्त आरोग्य अधिकारी यामुळे विभागातील ३५ गावांना हाल सोसावे लागत आहेत. महिन्याचा दुसरा व चौथा शनिवार आणि रविवार या दिवशी म्हणे प्राथमिक आरोग्य केंद्रांना रजा दिल्या आहेत. त्यामुळे डॉक्टर येत नाहीत. प्रसूतीस महिला घेऊन आलात तर तेथील एक आरोग्य सेविका सगळं कामकाज पार पाडते, असा अनुभव मोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणाऱ्या रुग्णांना येत आहे. येथील डॉक्टर अर्धा दिवस ड्यूटी व बाकीची सुटी अशा नियमात बसतात. हे डॉक्टर कोणाचेही ऐकत नाहीत, अशी तक्रार आमदारांच्या बैठकीत झाली. त्यावेळी आमदार म्हणाले, ‘मोरगिरी आरोग्य केंद्राचे डॉक्टर काय मंत्री लागून गेलेत का? एवढं सगळं महाभारत घडून सुद्धा मोरगिरी आरोग्य केंद्रात उपचारासाठी जाणाऱ्यांना माघारी फिरावे लागत आहे. कोकिसरे येथील एका महिलेस तीन महिन्यांपूर्वी सर्पदंश झाला. उपचारासाठी प्रथम या मोरगिरी आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तेथे कोणीही नाही, वेळ वाया गेला आणि मृत्यू ओढवला. (प्रतिनिधी)
आरोग्य केंद्रात जाताय; पण डॉक्टर कुठायत?
By admin | Published: August 28, 2016 12:02 AM