गोंदवले : राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘आमदार आदर्श ग्राम’ योजनेअंतर्गत गोंदवले खुर्द हे गाव दत्तक घेतले आहे. शासनाच्या विविध योजनांच्या पुढे जाऊन गावाचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावकऱ्याने हेवेदावे, गट-तट विसरून एकत्र यावे. सर्वांच्या सहभागाने स्वच्छतेसह पाणलोट, रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा पुरवून गावात व परिसरात हरित क्रांती घडवून गोंदवले खुर्द राज्यात आदर्श बनविणार आहे,’ असे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले. दरम्यान, त्यांनी दहा लाखांची वैयक्तिक वर्गणी दिली. ‘आमदार आदर्श ग्राम’ योजनेअंतर्गत गोंदवले खुर्द, ता. माण हे गाव दत्तक घेतल्यानंतर आयोजित ग्रामसभेत ते बोलत होते. प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सभापती आक्काताई मासाळ, तहसीलदार सुरेखा माने, गटविकास अधिकारी सीमा जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोडलकर, सरपंच, विविध विभागांचे अधिकारी व गामस्थांची उपस्थिती होती.आ. गोरे म्हणाले, ‘कोणत्याही राजकीय हेतूने गोंदवले खुर्द हे गाव दत्तक घेतलेले नाही. त्यामुळे कोणताही गट-तट न पाहता राजकीय जोडे बाहेर काढून गावकऱ्यांच्या सहकार्याने गावचा सर्वांगीण विकास आपण साधणार आहोत. सर्वांची मने एक झाली तर विकास साधता येणार आहे. सर्वांच्या सहभागाशिवाय आदर्श ग्रामनिर्मितीची संकल्पना शक्य होणार नाही. स्वत: सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्यांशी सुसंवाद साधून सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सहभागी करून गावच्या विकासाचा आराखडा तयार केला जाणार आहे.’ (वार्ताहर) आदर्श ग्रामनिर्मितीसाठी आयोजित ग्रामसभेला महिलांनी मोठी उपस्थिती दर्शविली होती.गावासाठी लोकसहभागाने विकासकामे करण्यासाठी सहकार्य करण्याचे सर्वांनी हात उंचावून सांगितले.आ. जयकुमार गोरे यांनी सर्वप्रथम दहा लाखांची वैयक्तिक वर्गणी देऊन लोकसहभागाचा शुभारंभ केला. त्यावर गावकऱ्यांनीही सढळ हस्ते मदत करण्याचे जाहीर केले.स्वच्छतेसह श्रमदानाच्या प्रत्येक कामातही आमदार स्वत: सहभागी होणार आहेत.
जयकुमार गोरेंकडून गोंदवले खुर्द दत्तक
By admin | Published: October 18, 2015 9:51 PM