ढेबेवाडी : ‘नाईकबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात गुलाल, खोबऱ्याच्या उधळणीत शुक्रवारी बनपुरी, ता. पाटण येथील नाईकबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी दोन लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लाभली.
चैत्र शुक्ल पंचमी व षष्टी हा नाईकबाचा नैवद्याचा व पालखी सोहळ्याचा दिवस असतो. त्याप्रमाणे या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविक उपस्थिती लावतात. शुक्रवारी पहाटे भाविकांनी देवाच्या पालखीची ‘नाईकबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात व गुलाल खोबºयाच्या उधळणीत आणि सासनकाट्या नाचवत सवाद्य मिरवणूक काढली.
यात्रेकरूंसाठी एसटी महामंडळाच्या सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हा आगार आणि कागल, कोल्हापूर, कºहाड, पाटण, इस्लामपूर, मिरज आदी आगारातून थेट देवालयापर्यंत आणण्याची सोय केली होती. एसटी महामंडळाने डोंगर पठारावरच बसेसची सोय केली.
देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रास्थळ व मंदिर आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने त्याद्वारे यात्रेवर प्रशासन नजर ठेवून होते. परिणामी कोणताही अनुचित प्रकार न घडता सालाबादप्रमाणे यंदाही यात्रा सुरळीत पार पडली.यात्रेसाठी बनपुरी ग्रामपंचायतीने नळपाणीपुरवठा योजनेद्वारे, देवस्थान ट्रस्ट, व पाटण पंचायत समिती, पाटण तालुका खरेदी-विक्री संघामार्फ त टँकरद्वारे पाण्याची सोय केली होती.
सळवे आणि सणबूर प्राथमिक आरोग्य केंद्र व ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालय या यंत्रणेद्वारे आरोग्यसेवा चोख कार्यान्वित ठेवली होती. पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, पाटणच्या पोलीस उपाधीक्षक नीता पडवी, मंडलाधिकारी प्रवीण शिंदे, ग्रामविकास अधिकारी राठोड आदींसह प्रशासकीय यंत्रणा रात्रभर जागून यात्रा नियोजन सांभाळत होते.