कवठे : ‘भैरवनाथाचं चांगभलं, काशिनाथाचं चांगभलं’चा गजर, गुलालाची उधळण आणि हजारो भाविकांची उपस्थिती अशा भक्तिमय वातावरणात सुरूर (ता. वाई) येथील बगाड यात्रा उत्साहात पार पडली. यंदा बगाड्या होण्याचा मान गजानन जगताप यांना मिळाला.सुरूरच्या बगाड यात्रेला पारंपरिक महत्त्व आहे. यंदाच्या यात्रेतही भाविकांना परंपरेचे दर्शन घडले. सकाळी ग्रामस्थांनी बगाड सुरूर व कवठे गावांच्या सीमेलगत पोहोचविले. यानंतर सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास बगाडाने सुरूर गावाकडे प्रस्थान करावयास सुरुवात केली. बगाड्यास यंदा पांढऱ्या रंगाचा शर्ट व भगवा लेंगा परिधान करण्यात आला. बगाड रथ मार्गस्थ झाल्यानंतर भैरवनाथाची पालखी बगाडाच्या पाठीमागे येत होती.पारंपरिक वाद्यांच्या गजरात व ‘काशिनाथाचं चांगभलं’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. ग्रामस्थ भैरवनाथाच्या श्रद्धेने बगाडाबरोबर धावत होते. ठराविक अंतरावर ग्रामस्थ आपापले बैल बगाडास जुंपत होते. संध्याकाळी सात वाजता निर्विघ्नपणे बगाड रथ सुरूर बाजार तळावर आणण्यात आला. यानंतर बगाड यात्रेची सांगता करण्यात आली. बगाड यात्रेत राज्यभरातील हजारो भाविक दाखल झाले होते. (वार्ताहर)हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीकबगाड हा उत्सव हिंदू बांधवांच्या ग्रामदैवत भैरवनाथाचा रथोत्सव. भैरवनाथ हा काशी या तीर्थक्षेत्राचा रक्षक मानला जातो. त्यामुळे त्यास ‘काशिनाथ’ असे संबोधले जाते. सुरूर गावात हिंदू-मुस्लीम बांधव गुण्यागोविंदाने राहत आहेत. दोन्ही समाज हे शेतीप्रधान असून, दोघांकडे बैल व पशुधन पुष्कळ प्रमाणात आहे. बगाड रथ ओढण्यासाठी मुस्लीम बांधवांनीही आपापले बैल जुंपले. तसेच ‘काशिनाथाचं चांगभलं’चा गजर करीत यात्रेत सहभाग घेतला.
गुलालात न्हाले सुरूरचे बगाड
By admin | Published: April 18, 2017 11:11 PM