लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: कोरोना महामारीतही सातारा शहरात मंगळसूत्र व सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा उच्छाद मांडला आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दहा मिनिटांच्या अंतरात चेन स्नॅचिंगच्या दोन घटना घडल्यामुळे महिलांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
राजवाडा मंडई गेटच्या समोर घडलेल्या चेन स्नॅचिंगनंतर लगेचच दहा मिनिटांच्या अंतरात मंगळवार तळे परिसरात दुसरी चेन स्नॅचिंगची घटना घडली. दोन्ही घटनांमध्ये सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, दोन्ही घटनांमध्ये चार अनोळखींवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटना ज्या ठिकाणी घडल्या आहेत त्या ठिकाणची पाहणी सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली आणि संबंधितांना तपासाच्या सूचना केल्या.
मंजिरी विजय कोल्हटकर (वय ६८, रा. मंगळवार पेठ, कोल्हटकर आळी, सातारा) या सोमवार, दि. १९ रोजी सायंकाळी पाच वाचून दहा मिनिटांच्या सुमारास राजवाडा मंडईच्या गेटसमोर असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखींनी त्यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीचे मिनी मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले. मंजिरी कोल्हटकर यांनी याबाबतची तक्रार याच दिवशी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दाखल केल्यानंतर दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला.
ही घटना घडल्यानंतर दहा मिनिटांच्या अंतरात चेन स्नॅचिंगची दुसरी घटना मंगळवार तळे परिसरात घडली आहे. सातारा येथील चिमणपुरा पेठेत राहणाऱ्या कोमल विवेकानंद जगदाळे (वय ५२, चिमणुपरा पेठ, सातारा) सोमवार, दि. १९ रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास मंगळवार तळ्यावरील डॉ. गोखले यांच्या दवाखान्यासमोरील शीतल मेडिकलसमोर उभे असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखींनी त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसका देऊन ओढून चोरून नेले. याप्रकरणी त्यांनी रात्री उशिरा शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोन अनोळखींवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी केली, मात्र चोरटे सापडले नाहीत.