कोपर्डे हवेली : रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रुग्णांचे दागिने कर्मचाऱ्यांना सापडले. त्यांनी ते प्रामाणिकपणे डाॅक्टरांच्याकडे दिले. डाॅक्टरांनी ते ओळख पटवून नातेवाइकांना परत दिले. त्यामुळे संबंधित रुग्णालयात तेथील डॉक्टर, त्यांच्या प्रामणिकपणाची चर्चा कराडसह ग्रामीण भागात सुरू आहे.
बेलवडे हवेली ता. कराड येथील अभयसिंह पाटील यांना या महिन्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी तो काळ अतिशय वाईट होता. त्यांची आई, वडील, भाऊ कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे अभयसिंह पाटील कराड येथील ओमकार हाॅस्पिटलचे डॉ. राहुल पाटील यांच्याकडे गेले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आई, वडील व भाऊ यांच्यावर उपचार सुरू केले. डाॅक्टर व स्टाफने त्यांना मोलाचे सहकार्य केले. मित्र, नातेवाईक यांनी त्यांना मोठा आधार दिला. या सर्व प्रसंगातून पाटील बाहेर पडले. सर्वजण घरी आल्यानंतर काही दिवसांनी लक्षात आले की अभयसिंह पाटील यांच्याकडे दिलेले गळ्यातील दीड तोळ्याचे दागिने गहाळ झाले आहेत. पण बरेच दिवस झाले असल्याने शोधणार कुठे, असा प्रश्न त्यांच्या पुढे होता. त्यामुळे हा विषय घरच्यांनी सोडून दिला. आपले आई, वडील व भाऊ सुखरूप घरी आले हीच देवाची कृपा अशी भावना मनात आणून पाटील यांनीही हा विषय सोडून दिला.
परंतु २२ जूनला अभयसिंह पाटील हे आपल्या पत्नीसह हाॅस्पिटलला गेले असता त्यांना तेथे बोर्ड दिसला. त्याबाबत चौकशी केली असता रुग्णालयात सापडलेला दागिना आईचा असल्याची त्यांची खात्री झाली. ओळख पटल्याने ते दागिने पाटील यांना परत करण्यात आले. या प्रामाणिकपणाबद्दल डॉ. राहुुल पाटील यांच्यासह रुग्णालयातील स्टाप पूजा देशमुख, सुरेखा पवार, रुपाली जगताप यांचे आभार मानत त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कॉम्रेड गणेश चव्हाण, काॅम्रेड विश्वास गरुड, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.