सातारा : येथील शनिवार पेठेतील एका घरात जाऊन मुलाचे लग्न जमविण्याचा बहाणा करून ८० हजार रुपये किमतीचे बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना दि. २१ रोजी दुपारी घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, राहूल अशोक थिटे (रा. शनिवार पेठ,सातारा) हे दि. २१ रोजी कामावर गेले होते. त्यादिवशी दुपारी त्यांचे आई-वडील दोघेच घरी होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी व्यक्तिने थिटे यांच्या आईला एकाचा पत्ता विचारून पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी दिल्यानंतर घरात कोण-कोण राहता असे संशयिताने विचारल्यानंतर थिटे यांच्या आईने माझ्या सुनेचे निधन झाले असून, सध्या मी,मुलगा, नातू व पती असे चारजण राहतो, अशी माहिती त्याला दिली.
त्यावर मी तुमच्या मुलाचे लग्न करून देतो, असे संबंधित संशयिताने सांगितले. त्यावर लगेच विश्वास ठेवत थिटे यांच्या आईने त्याला घरात बोलविले. त्यानंतर संशयिताने घरातील गहू, तांदुळ व सोन्याचे तीन दागिने, नारळ देण्यास सांगितले. शोभा थिटे यांनी तांदुळ, गहू, नारळ व त्यांचे मंगळसूत्र, मुलाच्या लग्नात घालण्यासाठी सुनेला केलेले मंगळसूत्र व त्यांची दोन ग्रॅम वजानची कर्णफुले असे बावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने संशयिताला दिले.
वस्तू ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्यांच्याच घरात एका वर्तमानपत्रावर सर्व साहित्य ठेवून पूजा मांडून शोभा व त्यांच्या पतीला पाया पडण्यास सांगितले. पाया पडल्यानंतर आता तुळशीच्या पाया पडून या, सर्व साहित्य मी ब्लाऊज पिसामध्ये बांधून माळ्यावर एका डब्यात ठेवतो, असे सांगितले. तसेच तो डबा सात दिवस पाहयाचा नाही,असेही सांगितले.
त्यानंतर संशयित निघून गेल्यानंतर शोभा यांना संशय आल्याने त्यांनी दागिने बांधून ठेवलेल्या डब्यात पाहिले असता त्यात दागिने दिसून आले नाहीत. हा प्रकार शोभा यांनी नातेवाइकांना कळवल्यानंतर चर्चा करून बुधवार (दि. २६) रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलाने अनोळखी संशयिताविरोधात तक्रार दिली आहे. पुढील तपास हवालदार हसन तडवी करत आहेत.