शिरवळ : शिंदेवाडी हद्दीमध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटामधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा १ लाख २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे शिंदेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिंदेवाडी हद्दीमध्ये उमा समीर सस्ते ह्या अपार्टमेंटमध्ये कुटुंबियांसमवेत राहतात. सस्ते ह्या शिक्षिका असल्याने अपार्टमेंटमधील घराला कुलूप लावून कामावर महाविद्यालयामध्ये गेल्या होत्या.
यावेळी बंद घराचे कुलूप चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात असलेले ७५ हजार रुपये किमतीचे २५ ग्राम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, १२ हजार रुपये किमतीचे चार ग्राम वजनाची दोन जोड सोन्याची कर्णफुले, २४ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या ८ ग्राम वजनाच्या दोन अंगठ्या, १ ग्राम वजनाचे ३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन मणी, १,५०० रुपये किमतीच्या सोन्याच्या तीन नथी, १ हजार रुपये किमतीचे एक जोड पैंजण, १० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
यावेळी ठसेतज्ज्ञांना व वीर या श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी फलटण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, शिरवळ पोलीस निरीक्षक उमेश हजारे, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सागर अरगडे यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई पुढील तपास करत आहेत.