लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कण्हेर धरणात पोहायला गेलेल्या अकलूजच्या भावी डाॅक्टरचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच परळी खोऱ्यातील उरमोडी धरणामध्येही मित्रांसमवेत पाेहायला गेलेला तरुण धरणात बुडाला आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
सागर महादेव देवकर (वय २१, रा. तारळे, ता. पाटण) असे धरणात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सागर देवकर हा साताऱ्यातील एका महाविद्यालय शिकत होता. चार ते पाच मित्रांसमवेत तो मंगळवारी दुपारी परळी खोऱ्यातील उरमोडी धरणाकडे गेला होता. त्यावेळी सर्व मित्र धरणात पोहण्यासाठी उतरले. सागर सुद्धा धरणात पोहण्यासाठी उतरला. तो धरणात पोहत असताना त्याला दम लागला. यातच तो बुडाला. त्याच्या मित्रांच्या हा प्रकार निदर्शनास आला. मात्र, त्याला वाचवता आले नाही.
या प्रकाराची माहिती मिळताच शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने तीन तास शोध मोहीम राबविली. मात्र, सागरचा थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेतली जाणार आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.
मित्रांना मानसिक धक्का...
सागर देवकर यांच्या वडिलांचे तारळे येथे सोन्या-चांदीचे दुकान आहे. तो मित्रांसमवेत साताऱ्यातच वास्तव्य करत होता. तो एकुलता एक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे त्याच्या मित्रांना जबर मानसिक धक्का बसला आहे.