कऱ्हाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. एरव्ही किलबिलाट असणाऱ्या वर्गखोल्या अबोल झाल्या आहेत. मात्र, शाळेच्या भिंती बोलक्या करण्याचे काम गोळेश्वर (ता. कऱ्हाड) येथे करण्यात आले असून, प्राथमिक शाळेच्या भिंतींवर आकर्षक चित्र, सुविचार तसेच बोधकथा रेखाटण्यात आल्या आहेत.
यावेळी दिलीपराव जाधव, भूषण जाधव, विशाल दिलीपराव जाधव, अॅड. विकास जाधव, उपसरपंच बबलू जाधव, महेश जाधव, तुषार जाधव, बंडा वाघमोडे, गौरेश जाधव, आदींची प्रमुख उपस्थिती होते.
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो, या उद्देशाने गोळेश्वर येथील दिवंगत सागर दिलीपराव जाधव यांच्या स्मरणार्थ जाधव कुटुंबीयांकडून जिल्हा परिषद शाळेला रंगरंगोटी करण्यात आली. सागर जाधव हे परिसरातील प्रत्येकाला मदत करत होते. मात्र, त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. याही परिस्थितीत समाजाशी असलेली बांधिलकी जोपासत जाधव कुटुंबीयांनी शाळेच्या भिंती बोलक्या करून सागर यांच्या स्मृती जागविण्याचा प्रयत्न केला. ११ जून रोजी या कामाला सुरुवात करण्यात आली. २३ जून रोजी हे काम पूर्णत्वास गेले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
फोटो : २८केआरडी०२
कॅप्शन : गोळेश्वर (ता. कऱ्हाड) येथील प्राथमिक शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत.