सातारा : ‘सीएम’ म्हणजे फक्त चीफ मिनिस्टर नव्हे, तर कॉमन मॅन. मी कॉमन मॅन व जनतेचा मुख्यमंत्री म्हणून काम केले. अडीच वर्षांत जेवढ्या योजना राबविल्या, तेवढ्या आजपर्यंत कोणीही राबविल्या नसतील. माझ्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढल्या गेल्या. दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते. जनतेने भरभरून दिले आहे. त्यामुळे जनतेला काय देतोय हे महत्त्वाचे आहे. माझा निर्णय बुधवारी पंतप्रधान मोदी, अमित शाह यांना कळविला असून, मुख्यमंत्रिपदाबाबत त्यांच्या निर्णयाला पाठिंबा आहे. त्यामुळे किंतु-परंतु नसावा,’ असे प्रतिपादन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
दरे (ता. महाबळेश्वर) येथे दोन दिवसांपासून मुक्कामी असलेल्या शिंदे यांनी रविवारी ठाण्याकडे रवाना होण्याच्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. शिंदे म्हणाले, ‘अमित शाह यांच्यासमवेत एक बैठक झाली आहे. आणखी एक बैठक महायुतीच्या तिन्ही नेत्यांची होणार आहे. त्यातून महाराष्ट्राच्या हिताचा योग्य तो
निर्णय आम्ही घेऊ. माझी भूमिका गेल्या बुधवारी स्पष्ट केली आहे. पुन:पुन्हा ती भूमिका मांडण्याची आवश्यकता वाटत नाही. आमच्यात चांगला समन्वय आहे.’
शनिवारी शिंदे यांची प्रकृती बिघडली होती. उपचारानंतर रविवारी तब्येतीत सुधारणा झाल्यावर ते सायंकाळी ४ वाजून २० मिनिटांनी हॅलिकॉप्टरने ठाण्याकडे रवाना झाले.
‘चर्चेने प्रश्न सुटतील’
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील, त्याला माझा पाठिंबा असेल. याशिवाय गृहमंत्री, विधान परिषद सभापतिपद कोणाकडे याच्याही चर्चा सुरू असून, चर्चेने सर्व प्रश्न सुटतील; परंतु पत्रकारांच्याच चर्चा जास्त असतात, अशी कोपरखळीही त्यांनी यावेळी मारली.
हे सरकार जनतेचा आवाज
महायुती सरकार हे जनतेचा आवाज आहे. आमचा अजेंडा विकासाचा होता. आमचे सरकार गोरगरिबांचे सरकार आहे. मी गरिबीतून आलेलाे आहे. मला गरिबीची जाणीव आहे. ज्या योजना आम्ही राबविल्या त्यांचा सर्वसामान्यांच्या जीवनात काही ना काही फायदा होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
‘तेव्हा ईव्हीएम कसे चांगले?’
शिंदे म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून दिले आहे. चांगले सरकार द्यावे, ही जनतेची अपेक्षा आहे. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. त्यामुळे विरोधक काय बोलतात, याकडे लक्ष देत नाही.
विरोधकांकडे विरोधी पक्षनेता होण्याइतकेही संख्याबळ नाही. त्यामुळे आता ईव्हीएमची चर्चा सुरू आहे. झारखंडमध्ये जिंकले, लोकसभेला जिंकले, लोकसभा पोटनिवडणुकीतही त्यांचा सदस्य निवडून आला आहे. तेलंगणातही यश आले आहे. त्यावेळी ईव्हीएम कसे चांगले, असा सवाल शिंदे यांनी केला.
दरेगावाहून थेट ठाण्यातील घरी
ठाणे : एकनाथ शिंदे रविवारी सायंकाळी ५:१५ वाजण्याच्या सुमारास दरे गावाहून ठाण्यात परतले. शिंदे यांचे ठाण्यातील रेमंड कंपनीच्या हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर शिंदेसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
आपल्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर केसरकर यांच्यासमवेतच शिंदे हे त्यांच्या ठाण्यातील नितीन कंपनीजवळील ‘शुभदीप’ या खासगी निवासस्थानी रवाना झाले. या वेळी त्यांच्यासमवेत खासदार श्रीकांत शिंदे हेही होते.
खासदार शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद दिले जाणार का, की ते शिंदेसेनेच्या अन्य आमदारांकडे दिले जाणार, यांपैकी कोणत्याही प्रश्नावर शिंदे यांनी उत्तर देण्याचे टाळले. त्यामुळे उपमुख्यमंत्री काेण हाेणार, गृहमंत्रिपदाबाबत काेणता निर्णय काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या आमदारांकडून घेतला जाणार हे सर्व अद्यापही गुलदस्त्यात आहे.
फडणवीसांचा शिंदेंना फोन
मुंबई : साताऱ्यातील दरे गावी मुक्कामी असलेल्या एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली होती. देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी त्यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी फोनवर इतर राजकीय चर्चा झाली की नाही, याबाबत माहिती मिळू शकली नाही.