प्रगती जाधव - पाटील
सातारा - वणव्यामुळे होणारी हानी लक्षात घेता त्याची दाहकता कमी करण्याचा भाग म्हणून 'लोकमत'ने वणवा मुक्तीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जनमानसातून मदतीचे हात पुढे आले आहेत. नव्या वषार्ची नवी सुरुवात वणवा मुक्त अभियानाने होणार असून त्याच्या शुभारंभाचा नारळ मान्यवरांच्या हस्ते अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी वाढवला जाणार आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगांनी व्यापलेल्या सातारा जिल्ह्यात वणवा ही मानवनिर्मित मोठी समस्या आहे. पर्यावरण रक्षण व प्रदूषण नियंत्रणासाठी एकाबाजूला मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना दुसऱ्या बाजूस वणवा लावून आपणच या प्रयत्नांची राखरांगोळी करत असतो. वणव्यामुळे होणारी जिवीत, वित्त व पर्यावरणाची हानी 'लोकमत'ने वेळोवेळी मांडली. त्याच्या परिणामांची दाहकता पहाता वणवा मुक्तीसाठी काही करण्याची निकड लक्षात घेऊन सातारा शहर व परिसरातून मदतीचे अनेक हात पुढे आले. या श्रमशक्तीचा पर्यावरण रक्षणासाठी उपयोग करण्याच्या हेतूने लोकसहभागातून वणवा प्रतिबंधक उपाययोजना करण्याचा उपक्रम आकाराला आला.
सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, साताऱ्याच्या वनक्षेत्रपाल शितल राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर जाळरेषा काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे तसेच सातारा शहरातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वणवा मुक्तीच्या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे. यावेळी जाळरेषा काढण्याच्या उपाय योजनेचे प्रात्यक्षिक वनविभाग दाखवणार आहे. साताऱ्यातील पर्यावरण प्रेमी, अजिंक्यतारा प्रेमी नागरिकांनी यावेळी उपस्थित राहून पर्यावरण वाचवण्यासाठीच्या उपक्रमाला पाठबळ द्यावे, असे आवाहन 'लोकमत'च्या वतीने करण्यात आले आहे.
असा राबवला जाईल उपक्रम!
वणवामुक्तीचा हा उपक्रम लोकसहभागातून व सातारा वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली राबवला जाणार आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावर रोज सकाळी सात ते नऊ या वेळेत दहा नागरिकांचा एक ग्रुप श्रमदान करून वनविभागाला सहकार्य करेल. रोज नागरिकांचे विविध गट याकामी श्रमदान करून पर्यावरण रक्षणासाठी योगदान देतील, अशी अपेक्षा आहे. ज्या नागरिकांना गटाने या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी प्रगती जाधव-पाटील मोबाईल ८७८८१३९९५४ यांच्याशी संपर्क साधावा.
हे होणार सहभागी
वणवामुक्तीसाठी जाळरेषा काढण्यासाठी श्रमदान करण्यासाठी ढाणे क्लासेसचे विशाल ढाणे, अजिंक्यतारा किल्ला ग्रुपचे अप्पा कोरे, जकातवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत सणस, गुरुकुल स्कूलचे राजेंद्र चोरगे, शाहूपुरी विकास आघाडीचे भारत भोसले, स्पंदन ग्रुपचे पंकज नागोरी, उद्योजक कन्हैय्या राजपुरोहित, सॅटर्डे क्लबचे अजित करडे, चित्रा भिसे यांनी तयारी दर्शविली आहे.
असं पोहोचाल कार्यक्रमस्थळावर
पोवई नाक्यावरून अजिंक्यताऱ्यावर येणाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणापासून शाहूनगरमध्ये प्रवेश करावा. तिथून अजिंक्य बझार चौक, गुरुकुल स्कूलमार्गे जगतापवाडीतून अजिंक्यतारा किल्ला पायथ्यावर पोहोचावं. चार भिंती परिसरातून येणाऱ्यांना पॅरेन्टस् स्कूलपासून किल्ला पायथा गाठता येईल.