सातारा : राज्यामध्ये नैसर्गिक संकटामुळे जनतेची ससेहोलपट सुरू असताना काही स्वार्थी लोक आपला हेतू साध्य करण्यासाठी एकत्र येत आहेत. प्रत्येकजण दिशाहीन झालेला आहे या परिस्थितीत देवाच्या कृपेने राज्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे चांगले सरकार लवकरच सत्तेत येईल, असे भाकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे यांची सदिच्छा भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील राजकीय तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्यानंतर प्रसार प्रसारमाध्यमांशी उदयनराजेंनी संवाद साधला.खासदार उदयनराजे म्हणाले, भाजपने आता राज्याची सूत्रे हाती घ्यायला हवी. सर्वसामान्य जनतेचे पाठबळ भाजपसोबत आहे. एक चांगलं शासन सत्तेवर यावं अशी जनतेची इच्छा आहे. सध्याच्या घडीला संकटाच्या मालिकेमुळे सर्वसामान्य जनतेची ससेहोलपट सुरू आहे. प्रत्येक क्षण दिशाहीन झालेला आहे. राज्यात जर स्थिर सरकार असेल तरच जनतेचे प्रश्न मिटतील.राज्यात विरोधी पक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर ताकदीने जनतेची बाजू मांडत आहेत, त्यांना लवकरच राज्याची मिळाली तर जनतेचे प्रश्न सुटले जातील. राज्यामध्ये काही लोक स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत. राज्य सरकार सत्तेवर आहे, त्यातील प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. त्यामुळे हे सरकार कुठल्याही एका निर्णयापर्यंत येत नाही.
वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना एकत्रित बांधून ठेवणे अवघड जाते. जे स्वार्थी लोक सोबत आलेले असतात, ते आपला हेतू साध्य केला की आपल्या मार्गाने निघून जातात. त्यामुळे विचारांनी एकत्र आलेले लोकच जनतेला सावरू शकतील, असा विश्वास देखील खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केला.