ओगलेवाडी : वाढती रुग्ण संख्येवर वेळेत नियंत्रण मिळावे आणि कोरोनाची साखळी लवकरात लवकर खंडित व्हावी यासाठी हजारमाची ग्रामस्तरीय कोविड दक्षता समितीने जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यास नागरिक आणि व्यापाऱ्यांनी दोन्ही दिवशी चांगला प्रतिसाद दिला. बाजारपेठेसह संपूर्ण ओगलेवाडी व हजारमाचीसह संपूर्ण परिसरात कडकडीत लाॅकडाऊन पाळला गेला.
लोकहिताच्या कामात नेहमीच मदतीचा हात देण्यासाठी ओगलेवाडीकर तत्पर असतात याचा प्रत्यय पुन्हा आला.
ओगलेवाडी परिसरातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी असणारी औद्योगिक वसाहत बाजारपेठ आणि भाजी मंडई यामुळे या परिसरात नेहमीच नागरिकांची वर्दळ पाहायला मिळते. या वर्दळीचा परिणाम म्हणजे या परिसरातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ही वाढती रुग्णसंख्या वेळीच रोखली नाही तर पुन्हा भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल हे ओळखून कोविड दक्षता समिती हजारमाची व सरपंच विद्या घबाडे व उपसरपंच प्रशांत यादव व सर्व सदस्यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते.
हा जनता कर्फ्यू २०, २१ एप्रिलला पाळण्यात आला. ग्रामपंचायत हजारमाचीच्या वतीने दोन दिवस ध्वनिक्षेपकावरून वातावरण निर्मिती केली जात होती. दक्षता समिती सदस्य ही बाजारपेठ परिसरात जनजागृती करीत होते. याचा परिणाम असा झाला की, जनता कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद लाभला. सर्व बाजारपेठ दोन दिवस कडकडीत बंद होती. नागरिकांनीही दोन्ही दिवस घरात राहून या अभियानात मोठी सक्रियता दिली. ओगलेवाडी आणि परिसर या काळात पूर्ण बंद असल्याने बाजारपेठ परिसरात शुकशुकाट जाणवत होता, तर रस्त्यावर फक्त राज्यमार्गावर तुरळक वर्दळ सुरू होती. ती इतर ठिकाणच्या वाहनांची होती. या प्रतिसादाने ज्या हेतूने कर्फ्यूचे आयोजन केले होते, तो हेतू सफल होण्यास हातभार लागणार आहे. पुढील काही दिवसांत येथील रुग्णसंख्येवर नियंत्रण येईल अशी आशा निर्माण झाली आहे.
चौकट
धोका समजून घेतल्याने प्रतिसाद : यादव
भविष्यातील संकटाची जाणीव करून दिली.
लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांना याची आवश्यकता का आहे याची जाणीवही स्पष्ट करून दिली. वाढती रुग्णसंख्या ही वेळेत रोखली गेली नाही तर भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल, हे येथील जनता आणि व्यापाऱ्यांनी समजून घेतल्यानेच प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला, अशी माहिती हजारमाजीचे उपसरपंच प्रशांत यादव यांनी दिली.