सातारा: साताऱ्यातील एमआयडीसीतून कर्नाटकातील विजापूर येथे नेलेला ७ लाखांचा किराणा माल एका व्यक्तीने परस्पर गायब केला असून, याप्रकरणी संबंधितावर सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज बक्षी असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये एफ अँड के ॲग्रो या नावाची कंपनी आहे. या कंपनीमधून राज बक्षी याने विविध प्रकारच्या मैद्याच्या बॅगांचा माल गाडीतून नेला. हा माल कर्नाटकातील विजापूरमधील सुजी मिठालाल अँड कंपनीमध्ये पोहोचविण्यात येणार होता. परंतु त्याने त्या ठिकाणी माल न नेता मोबाइल बंद करून तो मालासह पळून गेला. हा प्रकार दि. २ रोजी दुपारी समोर आला. यानंतर कंपनीतील कर्मचारी सचिन माने (वय ५४, रा. सदर बझार सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. राज बक्षी याचा संपूर्ण पत्ता फिर्यादीला माहीत नाही. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. महिला पोलिस नाईक शिंदे या अधिक तपास करीत आहेत.
कंपनीतील ७ लाखांचा माल परस्परच केला गायब, सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 2:13 PM