कऱ्हाड : कऱ्हाडात ‘दादा’, ‘भाई’, ‘डॉन’ म्हणवून घेणाऱ्यांची संख्या कमी नाही; पण आता हे ‘फॅड’ चक्क ‘सोशल मीडिया’वर वाढलय. चित्रविचित्र ‘स्लाईड शो’ तयार करून ते सोशल मीडियावर ‘व्हायरल’ करण्याची भलतीच ‘क्रेझ’ सध्या निर्माण झाली असून, गल्लीतल्या भाईंची ही फुकटातली ‘हवा’ पोलिसांची डोकेदुखी बनू शकते.
कऱ्हाडच्या चौकाचौकांत पूर्वी डझनावारी फलक लागायचे. मोठमोठ्या फोटोत ‘गल्लीदादा’ झळकायचे; पण अशा फलकांवर पालिकेने अंकुश आणला. त्यामुळे ‘हवा’ निर्माण करू पाहणाऱ्यांची गोची झाली. त्यानंतर चौकात केक कापून वाढदिवस साजरा करण्याचं ‘फॅड’ निघालं. मात्र, अशा फाळकूटदादांनाही पोलिसांनी चाप लावला. रस्त्यावर वाढदिवस साजरे करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले. त्यामुळे हे भूतही अनेकांच्या मानगुटीवरून उतरले.
मध्यंतरी भल्याभल्या ‘दादा’, ‘भाईं’ना पोलिसांनी तुरुंगाची हवा खायला लावली. तसेच गल्लीबोळात चुळबुळ करणाऱ्यांवरही ‘वॉच’ ठेवला. त्यामुळे फक्त स्वत:चा ‘भाव’ वाढविण्यासाठी ‘कॉलर टाईट’ करणाऱ्यांची पंचाईत झाली. ‘भाई’ म्हणवून घ्यायला कोणताच मार्ग सापडत नसताना काहींनी युवकांचे ग्रुप तयार केला. मात्र, पोलिसांनी काही टोळ्यांवर ‘मोक्का’चा फास आवळायला सुरुवात केल्यामुळे असे ‘ग्रुप’ही फुटायला लागले. युवक ग्रुपमधून बाहेर पडले. त्यामुळे ‘दादा’, ‘भाई’, ‘डॉन’ पुन्हा एकटे पडले. त्यातूनही आता मार्ग काढीत काहीजणांनी चित्रविचित्र फोटोंचे ‘स्लाईड शो’ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा सपाटा लावला आहे. तसेच इंटरनेटवर ते ‘अपलोड’ही केले जात असून, अशा ‘स्लाईड शो’ना ‘कॅप्शन’ही भन्नाट दिली जात आहेत. त्याद्वारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
- चौकट (फोटो : २२केआरडी०१)
अनलाईक करणाऱ्यांना तंबी...
सोशल मीडियावर ‘व्हायरल’ केलेल्या व्हिडिओसोबत कॅप्शन असतात. एका व्हिडिओच्या कॅप्शनला तर ‘अनलाईक करना मना है’ अशा आशयाचे धमकीदायक कॅप्शन दिलं गेल आहे. वास्तविक, अशा व्हिडिओंना ‘लाईक’ शेकडोत, तर ‘अनलाईक’ एकही नसल्याचं पाहायला मिळतं. भीती हे त्यामागचं कारण असावं.
- चौकट
कॉलेजचे युवक ‘टार्गेट’
भाईगिरी आणि ग्रुपचं आकर्षण महाविद्यालयीन युवकांमध्ये जास्त असत. त्यामुळे या आकर्षणाचा गुंडांकडून पुरेपूर वापर करून घेतला जात आहे. महाविद्यालयीन युवकांच्या सोशल मीडियावरील ग्रुपमध्ये असे व्हिडिओ हमखास ‘व्हायरल’ केले जाताहेत.
- चौकट
वाढदिवस ठरतोय निमित्त...
व्हिडिओ तयार करण्यासाठी वाढदिवसाचं निमित्त शोधलं जातंय. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच ‘मिक्सिंग’ करून दहशतपूर्ण व्हिडिओ बनविण्याकडे अनेकांचा कल आहे. ही दहशत फोटोतील हावभाव, शस्त्र, गाणी, डायलॉगद्वारे दिसून येते.
- चौकट
‘शूटर’, ‘किलर’, ‘आग’
सोशल मीडियावर टाकले जाणाऱ्या व्हिडिओची नावेही धक्कादायक अशीच आहेत. ‘किंग’, ‘रॉयल एंट्री’, ‘बॉयज’, ‘वसुली’, ‘आग’, ‘बाप’, ‘राडा’, ‘शूटर’, ‘किलर’, ‘कडक’ अशा कित्येक नावांच्या व्हिडिओंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.
- चौकट
कट्टा, तलवार, चाकूही...
अनेक व्हिडिओमध्ये शस्त्रांचे फोटो टाकण्यात आल्याचे दिसते. काही व्हिडिओमध्ये बंदूक, गावठी कट्टा, पिस्तूल यासारखी शस्त्र आहेत, तर काही व्हिडिओमध्ये काडतूस. काहींमध्ये तलवार, तर काहींमध्ये चाकूसारख्या धारदार शस्त्राच्या फोटोंचा वापर केला गेला आहे.
फोटो : २२केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाडातील काही गल्लीदादांनी सोशल मीडियावर दहशत माजविणारे व्हिडिओ ‘व्हायरल’ केले आहेत.