सातारा : विनयभंगप्रकरणी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. दरम्यान, उच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदत द्यावी, असा आमदार गोरे यांनी अर्ज केला. त्यावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवत निर्णय होईपर्यंत पोलिसांनी आमदार गोरे यांना अटक करु नये, अशा सूचना दिल्या. याप्रकरणी आज मंगळवारी सकाळी ११ वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. सातारा येथील एका विवाहित महिलेच्या मोबाईलवर आमदार जयकुमार गोरे यांनी व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून अश्लील संदेश पाठविल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आमदार गोरे यांच्या अटकपूर्व जामिनासाठी अॅड. डी. व्ही. पाटील यांनी अर्ज केला होता. गोरे यांच्या वतीने अॅड. धैर्यशील पाटील यांनी युक्तीवाद केला. त्यात फिर्यादीकडूनही मेसेज पाठवण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. आपण कुठल्याही मोबाईलवरुन मेसेज पाठवले नसल्याचे शपथपत्र फिर्यादीच्या वतीने न्यायालयात दाखल केले. यावेळी दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी सोमवारी आमदार गोरे यांचा जामीन अर्ज फेटाळल्याचा निर्णय दिला. यावेळी न्यायालयात आणि न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर या निर्णयावर अॅड. पाटील यांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी आवश्यक मुदत हवी असल्याचा विनंती अर्ज केला. तोपर्यंत आ. गोरे यांना अटक न करण्याचे आदेश पोलीस प्रशासनास द्यावेत, अशी मागणीही केली. यावेळीही दोन्ही बाजूने विविध खटल्यातील निकाल युक्तीवाद म्हणून सादर केले गेले. त्यावर न्यायाधीश मोहिते यांनी ‘निर्णय होत नाही तोपर्यंत आमदार गोरे यांना पोलिसांनी अटक करु नये,’ असे निर्देश दिले. याप्रकरणी आता मंगळवारी सकाळी ११ वाजता वाजता सुनावणी होणार आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. मिलिंद ओक हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)कॉँग्रेसचा गद्दार चर्चेत...‘मला विनयभंगाच्या प्रकरणात अडकविण्यामागे राष्ट्रवादीप्रमाणेच कॉँग्रेस पक्षातीलही काही गद्दारांचा समावेश आहे,’ असा आरोप आमदार जयकुमार गोरे यांनी केल्यानंतर गेल्या बावीस दिवसात कॉँग्रेसच्या एकाही नेत्याने याबाबत ब्र शब्द उच्चारला नव्हता. परंतु सोमवारी कॉँग्रेस भवनमध्ये जिल्हाध्यक्ष व आमदार आनंदराव पाटील यांना याबाबत छेडले असता ‘जयकुमारांनी गद्दारांची नावे जाहीर करावीत. पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल,’ असे सांगितले.
गोरेंचा जामीन अर्ज फेटाळला
By admin | Published: December 26, 2016 11:48 PM