कुडाळ : कोरोनाचा सुरुवातीचा कालखंड सर्वांसाठीच भीतीदायक होता. यावेळी आरोग्य विभाग, अंगणवाडी कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील अनेकांकडून कोरोना योद्धा म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावली. याच कालखंडात कर्तव्य बजावत असताना गणेशवाडी सरताळे, ता. जावली येथील अंगणवाडी सेविका कांताबाई तुळशीराम सूर्यवंशी यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. शासनाकडून यांच्याकरिता पन्नास लाखांचे विमाकवच देण्यात आले होते. त्यांच्या वारसांच्या खात्यावर पन्नास लाख रुपयांची विम्याची रक्कम नुकतीच जमा करण्यात आली.
कांताबाई सूर्यवंशी यांच्या बलिदानाबाबत आदरांजलीचे प्रमाणपत्र त्यांच्या कुटुंबीयांना नुकतेच प्रदान करण्यात आले. उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, प्रकल्पअधिकारी मानसी संकपाळ, विस्तार अधिकारी श्याम राठोड, आदी उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्याची जबाबदारी आशा व अंगणवाडी सेविकांवर होती. आशा कठीण व अत्यंत भयावह परिस्थितीतही आपल्या जिवावर उदार होऊन त्यांनी आपले कर्तव्य बजावले. त्यांचे हे कार्य कायमच सर्वांच्या स्मरणात राहील. या कोरोना योद्ध्यांनी दिलेल्या अनमोल योगदानानेच देशातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यास मदत झाली. या परिस्थितीत कर्तव्य बजावत असताना कोरोनाचा बळी ठरलेल्या गणेशवाडी (सरताळे), ता. जावली येथील कांताबाई सूर्यवंशी यांचे बलिदान जावलीतील जनतेला कायमच प्रेरणादायी ठरणार आहे.
सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना शासनाने जाहीर केलेली मदत मिळवून देण्यासाठी सातारा - जावलीचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, तत्कालीन तहसीलदार शरद पाटील, विद्यमान तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे शासनाने जाहीर केलेली रक्कम कोरोना योद्ध्यांच्या वारसांच्या खाती जमा करण्यात आली आहे.
फोटो : जावली तहसील कार्यालयात दिवंगत कांताबाई सूर्यवंशी यांच्या वारसांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.