सातारा : जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील हजारो शासकिय कर्मचारी आज, मंगळवार (दि.१४) पासून बेमुदत संपावर गेले आहेत. दरम्यान, सातारा शहरातील सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आला.सातारा जिल्ह्यातील सर्व राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, पालिका, नगरपंचायत कर्मचारी तसेच अंशकालीन कंत्राटी व रोजंदारी कर्मचारी आज, मंगळवार (दि. १४) पासून बेमुदत मोर्चावर गेले आहेत. सकाळी १०.३० वाजता सातारा परिसरातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा नेला. याठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी शासकीय कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच जे कर्मचारी संपात सहभागी झाले नाहीत त्यांनाही सहभागी करण्याचे आवाहन नेत्यांनी केले. प्रलंबित मागण्यांबाबत सातत्याने प्रयत्न झाले. परंतु, या रास्त मागण्यांना आजपर्यंत वाटाण्याच्या अक्षताच लावण्यात आल्या. सरकारने जुन्या पेन्शनच्या योजनेसाठी अभ्यास समिती नेमली असली तरी यापूर्वीही समिती नेमली आहे. त्यामुळे ठोस निर्णय होईपर्यंत संप सुरूच राहील. उद्यादेखील याच पद्धतीने सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेच्या नेत्यांनी केले.यानंतर आंदोलकांनी प्रतिकात्मक निदर्शने केली. यावेळी जुनी पेन्शन सुरू झालीच पाहिजे, अशा जोरदार घोषणा आंदोलकांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेद्वाराजवळील रस्ता आंदोलकांच्या गर्दीने फुलून गेला होता.दरम्यान, जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करु नका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकिय कर्मचाऱ्यांचा मोर्चा, कार्यालयांत सन्नाटा
By दीपक देशमुख | Published: March 14, 2023 1:04 PM