वाई : कोरोना महामारीमुळे एक महिन्याहून अधिक काळ रिक्षाचालकांचे उत्पन्नाचे साधन बंद झालेले आहे. यामुळे उदरनिर्वाहाचा त्यांच्यासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने रिक्षाचालकांसाठी अनुदान जाहीर केले होते. ते अद्याप देण्यात आले नाही. ते त्वरित द्यावे,’ अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन घाटगे यांनी केली.
तहसीलदार रणजीत भोसले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये वाई शहरासह वाई तालुका तसेच राज्यामध्ये एक महिन्याहून अधिक कालावधीसाठी लॉकडाऊन सुरू आहे. हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. काही रिक्षाचालकांच्या घरी वैद्यकीय अडचणीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच खालावली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील रिक्षाचालकांना व इतर वर्गाला एक हजार पाचशे रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केलेले आहे; परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत रिक्षाचालकांना मिळालेले नाही. तसेच शासनाकडून अद्याप कोणतीही प्रणाली तयार केलेली नसल्यामुळे रिक्षाचालकांना आर्थिक मदत मिळण्यामध्ये विलंब होत आहे. रिक्षाचालकांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, अन्यथा वाई शहरासह तालुक्यातील रिक्षाचालक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
निवेदनावर भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन घाटगे, जिल्हा चिटणीस यशवंत लेले, रिक्षांचे चालक-मालक महेश सावंत, दत्ता भिसे, जितेंद्र जगताप, समीर बागवान, प्रदीप भिसे यांच्या सह्या आहेत.