वाठार स्टेशन : राष्ट्रीय चित्रपट विकास संस्था (एनएफडीसी) आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने ‘स्वच्छ भारत’ या विषयावरील लघुपट महोत्सवात देशभरातून चार हजार आठशे जणांनी सहभाग घेतला होता. यामध्ये चौधरवाडी, ता. कोरेगाव येथील डॉ. सुयश तानाजीराव शिंदे यांनी ग्रामीण कथानकावर आधारित तयार केलेल्या ‘सेल्फी’ या लघुपटास देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. सातारा जिल्ह्यातील पहिल्यांदाच अशा प्रकारचे यश मिळविणारा हा पहिलाच लघुपट ठरला आहे.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील चौधरवाडी सारख्या छोट्याशा गावात जन्मलेले डॉ. सुयश शिंदे हे सध्या पुणे येथे दंत चिकित्सक म्हणून डॉक्टरी व्यवसाय करत आहेत. या व्यवसायाबरोबरच त्यांनी लघुपट, चित्रपट निर्मितीचा छंद जोपासला आहे. व्यवसायाने डॉक्टर असतानाही गावच्या मातीशी एकरूप असलेल्या सुयश यांनी ‘सेल्फी’ हे उघड्यावर शौचाला न बसण्या विषयीच्या सरकारने दिलेल्या सूचना आणि सुविधा त्याचा ग्रामीण पातळीवरील काही काळ होणारा दुरुपयोग आणि त्यातून निर्माण होणारा आरोग्याचा प्रश्न यावर हा लघुपट बनविला आहे.यामध्ये प्रशांत तपस्वी, प्रेम नरसाळे आणि अंजली जोगळेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.या लघुपटात रोगराई, जंतू आणि फिव्हर, बसू नको रे उघड्यावर असं एक गीत ही प्रदर्शित करण्यात आले आहे. केवळ तीन मिनिटांत अपेक्षित संदेश पोहोचण्याचा शिंदे यांनी केलेला प्रयत्न परीक्षक निर्माती वीणा त्रिपाठी, अॅडमेकर प्रल्हाद ककड आणि फिल्ममेकर गीतांजली राव यांनी उचलून धरला. देशभरातील चार हजार आठशे लघुपटातून त्यांच्या ‘सेल्फी’ या लघुपटाची झालेली निवड ही सातारा जिल्ह्यासाठी भूषणावह मानली जात आहे.डॉ. सुयश शिंदे यांचा या यशाबद्दल नुकताच दिल्ली येथे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, गायक कैलाश खैर उपस्थित होते.डॉ. शिंदे यांनी यापूर्वी स्त्री भ्रूणहत्या विषयी भाष्य करणारा व्हॉट इफ आणि दुसऱ्यांच्या आनंदात गवसलेला मुलाचा क्वेस्ट फॉर हॅपिनेस या दोन लघुपटांची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या सिनेमाचे सहायक म्हणूनही काम पाहिले आहे. (वार्ताहर)
साताऱ्याच्या ‘सेल्फी’वर सरकारी मोहर
By admin | Published: October 06, 2016 12:41 AM