सातारा : महाराष्ट्रात गेली चार वर्षे शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. यातच अवेळी गारपीट आणि वादळी पाऊस यामुळेही शेतकऱ्यांच्या फळे, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. धान्य शेती, फळबागा, फूलशेती याचबरोबर दुभती जनावरे शेळया, मेंढया, कुक्कटपालन, बैले यांनाही दुष्काळाचा फटका बसला. त्यामुळे शासनाने तत्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांना प्रती कुटुंबी बिनव्याजी १५००० रुपये खावटी कर्ज दयावे, आता काही भागात पडणाऱ्या पावसाचा फायदा रब्बी हंगामात होण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज ताबडतोब दयावे, दुष्काळी भागातील शेतकरी, बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार (शेतमजुरांसह) यांची यांच्या मुलांची शाळेची फी व ते राहात असलेल्या होस्टेलचा सर्व खर्च शासनाने खास बाब म्हणून करावा, दुष्काळी भागातील शेतकरी व शेतमजुरांच्या आरोग्याची काळजी पुढच्या पिकांचे पैसे हातात मिळेपर्यंत सरकारने घ्यावी, दुष्काळी भागामध्ये वीज बिलाचेही पैसे शासनाने भरावेत. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गंत एकूण उपसा सिंंचनासाठी ५ लाख हॉर्स पॉवरचे पंप बसवून तयार आहेत, त्यापैकी म्हैसाळ, ताकारी, टेंभू , पुरंदर, उरमोडी, कवठे-केंजळ, तारळी यांना पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे, त्यामुळे या योजनांचे खास बाब म्हणून प्रलंबित वीज देयके भरुन या योजना सुरु कराव्यात, यांचे पाणी अवर्षण प्रवण भागात जाते. लाभित शेतकऱ्यांना चाऱ्याची पिके घ्यावयास सांगून शासनाने तो चारा विकत घेऊन दुष्काळी भागात दिल्यास चाऱ्यावर खर्च होणारे किमान १०० कोटी वाचतील. (प्रतिनिधी)
शासनाने तत्काळ दुष्काळ जाहीर करावा
By admin | Published: September 19, 2015 11:49 PM