\तांबवे : ‘युवकांच्या हाताला काम द्यायचे असेल तर मोठ-मोठे उद्योगधंदे तालुक्यात आले पाहिजेत. शेतीमध्ये औद्योगिकरण झाले तर सर्वांगिण विकास होईल. सध्या सरकारला प्रशासनाचा अनुभव नाही. त्यामुळे त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने, केलेल्या घोषणा हवेतच राहिल्या आहेत. सध्या राज्यात पाऊस न पडल्यामुळे गंभीर दुष्काळ समस्या निर्माण झाली आहे. याला सामोरे जाण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. साजूर, ता. कऱ्हाड येथील विविध विकासकामे भूमीपूजन व उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषद आमदार आनंदराव पाटील, काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती सुनील पाटील, संचालक प्रकाश पाटील, सह्याद्री कारखाना संचालक पी. डी. पाटील, सरपंच शीतल मुळगावकर, उपसरपंच संदीप पाटील, माजी पंचायत समिती सदस्य भीमराव डांगे, विजय चव्हाण, पंचायत समिती सदस्य प्रकाश वास्के, जे. के. पाटील, सुरेखा डुबल, सूपने सरपंच प्रदीप थोरात, जखिणवाडी सरपंच नरेंद्र पाटील, इंद्रजित चव्हाण, अॅड. विश्वास निकम, अशोक पाटील आदी उपस्थित होते.आमदार चव्हाण म्हणाले, ‘कऱ्हाड दक्षिण मतदार संघाचा विकास कामातून कायापालट करणार आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी राज्यातील प्रशासनाची घडी बसविली आहे. यामुळे आज आपले राज्य एक प्रगतशील राज्य म्हणून ओळखले जाते. साखरेचे दर घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ मिळते की नाही याची चिंता आहे. शेतकऱ्याला आपल्या पायावर उभे करायचे असेल, तर या सरकारने कर्जमाफी करू न त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. आज लोकसहभागातून गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी झटले पाहिजे,’ असे त्यांनी यावेळी सांगितले.आमदार पाटील म्हणाले, ‘तांबवे जिल्हा परिषद मतदार संघ कुणी पाटणला जोडला हे सर्वांनाच ज्ञात आहे. काँग्रेसची अनेक पदे भोगूनही पदाविरूद्ध कामे केली आहेत. त्यांना बाबांनी विधानसभेमध्ये जनाधार दाखविला आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कऱ्हाड तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी विकासकामासाठी आणला आहे.’यावेळी शीतल मुळगावकर, विकास कांबळे, पी. डी. पाटील, प्रकाश पाटील, हिंदुराव पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमास विविध गावचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे विजय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. शीतल मुळगावकर व उपसरपंच संदीप पाटील यांनी स्वागत केले.विकास कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.विजय चव्हाण यांनी आभार मानले. (वार्ताहर)
सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी
By admin | Published: December 30, 2015 10:53 PM