सातारा : भिलार, ता. महाबळेश्वर येथे हद्दी कायम करण्याचे काम करत असताना पोलिसांसमोरच दंगा करून शासकीय काम बंद पाडले. याप्रकरणी १५ जणांवर पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पाचगणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भिलार (ता. महाबळेश्वर) येथील सर्व्हे नंबर २७ मध्ये अधिकारी व पोलिस अंमलदार यांच्यासमक्ष हद्दी कायम करण्याचे शासकीय काम सुरू होते. त्या ठिकाणी किसन गेणू भिलारे, राजे भिलारे (रा. भिलार, ता. महाबळेश्वर) यांच्यासह १५ पुरुष आणि स्त्रिया आल्या. या सर्वांनी दंगा करून शासकीय काम करत असताना अडथळा आणून काम बंद पाडले.
बेकायदेशीर जमाव जमवून मोठमोठ्याने आरडाओरड केली. या प्रकारानंतर डाॅ. विनय देशमाने (रा. कुलाबा मुंबई) यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिस हवालदार कैलास रसाळ हे अधिक तपास करीत आहेत.दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत यातील कोणालाही पाचगणी पोलिसांनी अटक केली नव्हती.