पाचगणी : करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय पाचगणीतील सेंट झेवीयर निवासी शाळेने शाळा सुरु करण्यासाठी विद्यार्थी बोलावून वसतिगृह सुरु केल्याने एकच खळबळ उडाली आहे.करोनाच्या जागतिक महामारीमुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय पाचगणीतील सेंट झेवीयर हायस्कूलने निवासी शाळा सुरु केल्याने एकच खळबळ उडालीआहे.शैक्षणिक केंद्र असलेल्या पाचगणी येथील सदर शाळा प्रशासनाने राज्य सरकार व जिल्हाधिकारी यांचा आदेश डावलून केंद्र शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू करण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी पालकांना पत्र पाठवून २१ सप्टेंबर रोजी शाळा सुरू होणार असल्याचे कळवले. त्यामुळे निवासी विद्यार्थी ताबडतोबीने शाळेत दाखल करावेत असे पत्र पालकांना पाठवले.त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना शाळा सुरु होण्या आगोदर शाळेच्या हवाली केले.वास्तविक शाळा सुरु करण्याआधी विद्यार्थी, पालक शिक्षक आणि शासन यंत्रणा याच्यात एकमत होणे गरजेचे होते.करोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्याआधीच कोव्हीड हाँस्पिटल असणाऱ्या परिसरात शाळा सुरू करण्याचा घाट घातल्याने व वसतिगृहात विद्यार्थी दाखल झाल्याने पाचगणीत कुजबुज सुरू झाली.करोनाच्या धास्तीने पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास राजी नसतानाही शाळा प्रशासन मुलांच्या शैक्षणिक नुकसानीची भिती दाखवून व मुले निवासी शाळेत दाखल करून घेण्यास हरकत नाही असे लेखी घेऊन शाळेत पाठवण्यास भाग पाडले.
करोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता इतक्यात शाळा उघडण्यासाठी पोषक वातावरण नसताना निवासी शाळा सुरू केल्याची माहिती मिळताच महाबळेश्वर तालुका गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देत तपासणी केली. पाचगणीतील सर्व निवासी व बिगर निवासी शाळा बंद असताना प्रशासनाला शाळा उघडण्याची कसली घाई होती याची प्रशासन माहिती घेत आहे.
राज्यात सर्वत्र शाळा बंदचे शासनाचे धोरण असताना, या शालेय व्यवस्थापनाने मुलांच्या आरोग्याबाबत प्रशासनाचे नियम आणि कायदा मोडण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महाबळेश्वरच्या तहसीलदारांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.आनंद पळसे ,गटशिक्षणाधिकारी, महाबळेश्वर