CP Radhakrishnan: देशात छत्रपती शिवाजी महाराज नसते तर माझे नाव दुसरे असते, असं विधान महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या पहिला दीक्षांत समारंभ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बोलत होते. यावेळी ६७९ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. यावेळी बोलताना जात आणि धर्माच्या आधारावर कोणाशीही भेदभाव केला जाऊ नये, असंही राज्यपालांनी म्हटलं.
"सातारा ही संपूर्ण महाराष्ट्रातील एका ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली हिंदवी स्वराज्याची ही तिसरी राजधानी होती. जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान योद्धा या देशात जन्माला आला नसता तर काय झाले असते? आज मी इथे 'राधाकृष्णन' नावाने उभा आहे. तर माझे नाव दुसरे काहीतरी असू शकले असते. भारतमातेच्या आत अनेक पाकिस्तान असू शकले असते. ते (छत्रपती शिवाजी महाराज) एक महान योद्धा होते ज्यांनी आक्रमकांविरुद्ध लढा दिला," असं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले.
“आपण इस्लामच्या विरोधात आहोत का? तर नाही. सगळं संपलं. आपल्या सर्वांना एकत्र राहायचे आहे. पण, आपण इतिहासाचे वास्तव समजून घेतले पाहिजे. आपल्याला सत्य जसे आहे तसेच माहित असले पाहिजे. वर्षानुवर्षे संघर्ष केल्यानंतर, आज भारत हळूहळू त्याच्या प्राचीन वैभवाकडे वाटचाल करत आहे. आपण जात आणि धर्माच्या आधारावर कोणाशीही भेदभाव करू नये. माणसाची महानता त्याच्या जातीने नाही तर त्याच्या कर्माने ठरवली जाते. आपण हे आयुष्यभर लक्षात ठेवले पाहिजे, असंही सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं.
दरम्यान, यापूर्वी सी. पी. राधाकृष्णन यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षांत समारंभात बोलताना छत्रपती शिवरायांचा उल्लेख केला होता. "हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आज मी सी. पी. राधाकृष्णन म्हणून तुमच्या समोर नसतो. शिवरायांच्या शौर्यामुळे आपण सर्वजण आहोत, ते केवळ महाराष्ट्राचे राजे नव्हते, तर अखंड भारताचे राजे होते. छत्रपतींचा विचार घेऊनच विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण केलं पाहिजे," असं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं होतं.