पाटण : समाज घडविणाऱ्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात ‘क्लास टू’ दर्जाचे गटशिक्षणाधिकारी पद मिळणे, हे केवढे भाग्य. पण शैक्षणिक वातावरणात वावरताना एखाद्या अधिकाऱ्याच्या मनात वाईट विचार येणे अन् त्याच्या हातून तसे कृत्य घडणे, हे समाजाच्या दृष्टीने पाप समजले जाते. असेच भ्रष्टाचाराचे पाप पाटण तालुक्याचे गटशिक्षाअधिकारी विलास भागवत यांच्या हातून वेळोवेळी घडत गेले अन् शेवटी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले. एक हजाराची लाच घेताना भागवत यांना पकडलं अन् शिक्षण क्षेत्राबरोबरच नागरिकांमधूनही ‘गटशिक्षणाधिकारी... तुम्हीसुद्धा?’ असा प्रश्नांकित उद्गार बाहेर पडला.गटशिक्षणाधिकारी विलास भागवत यांनी पाटण तालुक्याचा कार्यभार स्वीकारून अडीच वर्षे झाली. शाळा तपासणीला गेले तरी पाचपन्नास तरी घेऊन येणारच, अशी त्यांच्या कामाची पद्धत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील लोकांमधून बोलले जात आहे. एखाद्या शिक्षकाची बदली, सेवापुस्तक, पगार किंवा रजा असो पहिले दाम फिर काम, अशी पद्धत गटशिक्षणाधिकारी भागवत यांनी वापरली होती. याबाबत अनेकवेळा लोकप्रतिनिधींनी भरसभेत त्यांची कानउघडणी करूनही भागवत यांच्या कार्यपद्धतीत बदल होत नव्हता. त्यांच्या या कार्यपद्धतीचा जाच पाटण शिक्षण विभागात शिक्षक सोसत असतानाच अखेर एका शिक्षकानेच लाचलुचपत विभागाची दारे ठोठावली अन् स्वत:च्या कक्षेतील लोकांचेच शोषण करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी भागवत गळाला लागले. एक हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने भागवत यांना रंगेहाथ पकडले. (प्रतिनिधी) माणनंतर पाटणचा मान!गेल्या काही महिन्यापूर्वी माणचे गटशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात साडपले. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पाटणचे गटशिक्षणाधिकारी भागवत यांना जाळ्यात पकडले. विशेष म्हणजे विलास भागवत मूळचे माण तालुक्यातील म्हसवड (कोष्टीनगर) परिसरातील आहेत. अटक करण्यात आलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांची पाळेमुळे नक्कीच शोधली जातील, अशी चर्चा शिक्षण विभागात सुरू आहे.
गटशिक्षणाधिकारी... तुम्हीसुद्धा?
By admin | Published: July 22, 2015 9:35 PM