सातारा : केंद्र शासनाने गॅस दरवाढ करुन गोरगरिबांचे जगणे मुश्कील केले असल्याचा आरोप करत महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी साताऱ्यात शेणाच्या गोवऱ्या भिरकवत केंद्र सरकारचा निषेध केला.
जिल्हा काँग्रेसच्या वतीने महागाईविरोधात पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकली रॅली काढण्यात आली. या वेळी केंद्र सरकार हाय हाय, पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेच पाहिजेत, मोदी तेरा कैसा खेल, सस्ता दारू, महंगा तेल अशा घोषणा देऊन केंद्र केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले, की पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढ ही रोजची आहे. केंद्र सरकारला सामान्य माणसाचे काही देणे घेणे नाही. ते फक्त भांडवलदार आणि उद्योगपती यांचे सरकार झाले आहे. केंद्र सरकारच्या कारभाराने संपूर्ण राज्यातील जनता हैराण झाली आहे. मोदी सरकारने केलेल्या महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक राहणार असून सरकारला विचार करायला भाग पाडू, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ तसेच वाढत्या महागाईने सामान्य जनता हैराण झाली आहे. त्याचे जगणे मुश्कील झाले आहे. याला केंद्र सरकारची धोरणे जबाबदार असून केंद्र सरकारच्या विरोधात सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने डॉ. जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय सायकली रॅली काढण्यात आली. मोदी सरकारने ७ वर्षांत महागाईने कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल व डाळींची दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी करत महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने गोवऱ्या भिरकवण्यात आल्या. या वेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी कार्याध्यक्ष ॲड. विजयराव कणसे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, प्रदेश प्रतिनिधी अजित पाटील-चिखलीकर, रजनी पवार, अन्वर पाशाखान, युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, मनोज तपासे, चंद्रकांत ढमाळ, नरेश देसाई, प्रतापसिंह देशमुख, बाबुराव शिंदे, हेमंत जाधव, सुषमाराजे घोरपडे, प्रकाश फरांदे, माधुरी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ : सातारा येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी गॅस, इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढली. (छाया : जावेद खान)