सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : घंटागाडीच्या माध्यमातून कचरा वेळेत उचलला जावा व कामकाजात पारदर्शीपणा यावा, यासाठी पालिकेने चाळीस घंटागाड्या जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) प्रणालीशी जोडल्या आहेत. पालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या तक्रारींचा ओघ कमी झाला असून, शहरात कचरा साचण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.सातारा पालिकेच्या वतीने स्वच्छतेचा ठेका ‘यशश्री’ या खासगी कंपनीला देण्यात आला आहे. ही कंपनी चाळीस घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरात कचरा संकलनाचे काम करीत आहे. यापूर्वी घंटागाडी प्रभागात येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून नेहमीच केला जात होता. त्यामुळे घंटागाड्या जीपीसएस प्रणालीला जोडण्याची मागणी वारंवार केली जात होती. या मागणीला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.स्वच्छतेचा ठेका बदलल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व चाळीस घंटागाड्या जीपीएस प्रणालीला जोडल्या आहेत, त्यानुसार प्रत्येक घंटागाडीवर एक चीप बसवण्यात आली आहे. तिच्या माध्यमातून दिवसभरात संबधित घंटागाडी कुठे व कोणत्या भागात किती फिरली, एका ठिकाणी किती वेळ थांबली, कचरा संकलन करून ती डेपोपर्यंत पोहोचली की नाही, याची माहिती अधिकाऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. एका गाडीला ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सुमारे साडेतीन हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.सर्व घंटागाड्या जीपीएस प्रणालीत निश्चित केलेल्या मार्गानुसार कचरा संकलन करीत आहेत. त्यामुळे या घंटागाड्यांना ठरवून दिलेल्या मार्गावरून कचरा संकलनाचे काम करावे लागत आहे. जीपीएस प्रणालीमुळे घंटागाड्यांच्या कामकाजात पारदर्शीपणा आल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.तक्रारींचा ओघ कमीघंटागाड्यांना जीपीसएस प्रणाली बसविण्यापूर्वी काही प्रभागात घंटागाड्या येत नसल्याच्या तक्रारी नागरिक वारंवार करीत होते. या तक्रारी आता जवळपास बंद झाल्या आहेत. जीपीएस प्रणालीचा वापर होत असल्याने पालिकेच्या वतीने निश्चित करण्यात आलेल्या प्रत्येक मार्गावरील कचरा संकलन करणे क्रमप्राप्त आहे. एखाद्या मार्गावर घंटागाडी कर्मचाऱ्यांनी जायचे टाळल्यास आरोग्य विभाग याची तातडीने नोंद घेत आहे.
घंटागाड्यांना ‘जीपीएस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:14 PM