सातारा : वाहतूक कोंडीतून सातारकरांची सुटका करणाऱ्या पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काम जवळपास संपले असून, आता फक्त उद्घाटनाच्या मुहूर्ताची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याला मुहूर्त मिळू शकतो. एकाचवेळी तिन्ही मार्ग सुरू होण्याने सातारकरांचा प्रवास सुसाट होईल.
सातारा शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा, यासाठी पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू करण्यात आले होते. गेल्या पावणेतीन वर्षांपासून यंत्रणा कामाला लागली आहे. सुरुवातीला ६० कोटी रुपयांचे हे काम होते; मात्र त्यानंतर गोडोलीकडे जाणाऱ्या मार्गाचे अधिक काम करण्यात आले. त्यासाठी अतिरिक्त १५ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यामुळे संपूर्ण ग्रेड सेपरेटरचे काम हे ७५ कोटींवर गेले.
सद्य:स्थितीत सेपरेटरमधील तिन्ही मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता फक्त ग्रेड सेपरेटर सुरू करण्यासाठी मुहूर्त काढावा लागणार आहे. सध्या ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. मतमोजणीनंतर आचारसंहिताही संपेल. त्यानंतर उद्घाटन करून ग्रेड सेपरेटर सातारकरांच्या सेवेत दाखल होऊ शकतो.
या सेपरेटरमध्ये नगरपालिका, गोडोली आणि जिल्हा परिषद असे तीन मार्ग आहेत. त्यातील पालिका मार्गावर ५७५ मीटरचे काम झाले आहे. ३६० मीटरवर स्लॅब आहे. या मार्गावरील किरकोळ कामे राहिली होती, ती पूर्णत्वास गेली आहेत. जिल्हा परिषद रस्त्याचे कामही पूर्णत्वाकडे गेले आहे. या मार्गावर २२० मीटर लांबीचे काम होते, तर या मार्गावर असलेला १६० मीटरचा स्लॅब मागेच पूर्ण झालेला आहे.
चौकट :
पावणे तीन वर्षे लागली...
ग्रेड सेपरेटरमधील गोडोली रस्ता महत्त्वपूर्ण आहे. कारण, हा मार्ग दुहेरी वाहतुकीसाठी आहे. ४२५ मीटर लांब असून, स्लॅब १६५ मीटरवर आहे. स्लॅबचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच अंतर्गत कामेही पूर्णत्वास गेली आहेत. ग्रेड सेपरेटरचे संपूर्ण काम हे ७५ कोटींचे आहे. येणाऱ्या नवीन वर्षात सातारकर आपली वाहने ग्रेड सेपरेटरमधून नेणार हे स्पष्ट आहे. दरम्यान, ग्रेड सेपरेटरचे काम दीड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन होते; पण अनेक कारणांनी पावणे तीन वर्षे लागली, तर कोरोनामुळेही कामगार नसल्याने काम हळूहळू सुरू होते.