कुकुडवाड : गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर गावात राजकीय चर्चेला उधाण आले होते; मात्र गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन यंदाची सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्धार केला होता. केलेल्या निर्धाराने माण तालुक्यातील पुकळेवाडी या गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सात जागांसाठी सर्व ग्रामस्थांच्यावतीने फक्त सातच अर्ज दाखल करून ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात पुकळेवाडीकर ग्रामस्थ यशस्वी झाले.
सध्या कोरोनाची भयानक साथ व अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य शेतकरी व मतदार वर्गाला हेवेदावे, भांडण तंटे, वाद विवाद तसेच पैशाचा काळाबाजार यांच्यापासून वाचविण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा जणू काय विडाच उचलला होता. माण तालुक्यातील पुकळेवाडी गाव हे राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील मानले जाते. मात्र गावातील पारंपरिक राजकारण व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सर्व ग्रामस्थांच्यावतीने सात जागांसाठी सात तरुण तडफदार सदस्यांना बिनविरोधसाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. अर्ज दाखल करण्याचा शेवटच्यादिवशी सात जागांसाठी फक्त सातच अर्ज दाखल करून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यामुळे ग्रामपंचायतीच्या विकासासाठी शासनाच्यावतीने २५ लाखांपर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निधीचा उपयोग करून गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी चांगला फायदा होणार आहे. पुकळेवाडीकर ग्रामस्थांच्यावतीने ब्रह्मदेव पुकळे, तानाजी पुकळे, विजय पुकळे, सपना पुकळे, पिनाबाई पुकळे, अलका पुकळे, रंजना पुकळे अशा या सात उमेदवारांना बिनविरोध निवडून देण्यात पुकळेवाडी ग्रामस्थ यशस्वी झाले. बिनविरोध निवड झालेल्या सर्व सात ग्रामपंचायत सदस्यांचे व पुकळेवाडी ग्रामस्थांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुकळेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी अप्पासाहेब पुकळे आणि ब्रह्मदेव पुकळे यांनी परिश्रम घेतले. तसेच ग्रामस्थांच्यावतीने तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आले.