-दीपक शिंदे सातारा - जिल्ह्यातील २५९ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरु असून साडे आकरापर्यंतच्या माहितीनुसार अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागला आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात तर शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठ्या ग्रामपंचायतीत धोबीपछाड दिली आहे. आतापर्यंतच्या कलानुसार भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांना अनेक ग्रामपंचायतीत सत्ता मिळाल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील २५९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. तर मंगळवारी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली. आतापर्यंतच्या निकालानुसार भाजप आणि राष्ट्रवादीलाच सर्वाधिक ग्रामपंचायतीत सत्ता मिळाल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचीही अनेक ग्रामपंचायतीत सत्ता आली आहे. माण तालुक्यात शेखर गोरे यांच्यामुळे ठाकरे गटाला काही ग्रामपंचायतीत शिरकाव करता आला. माणमधीलच कुरणेवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप गटाकडे गेली आहे. तर महाबळेश्वरवाडीत आमदार जयकुमार गोरे आणि जिल्हा बॅंक उपाध्यक्ष अनिल देसाईंकडे राहिली आहे. माणमधील बहुतांशी ग्रामपंचायती भाजपकडे राहण्याचा कल आहे.
कऱ्हाड तालुक्यातील आटके ग्रामपंचायतीत ३५ वर्षानंतर सत्तांतर झाले आहे. सरपंचपदी महािवाकस आघाडीचा विजय झाला. वडगाव हवेलीत सत्तांतर होऊन भाजपला विजय मिळाला. तर येथे काॅंग्रेसला धक्का बसला आहे. फलटण तालुक्यातील विडणी ग्रामपंचायत महत्वाची असते. याठिकाणी भाजपचा सरपंच झाला आहे. तर बहुचर्चीत गिरवीत सह्याद्री कदम यांच्या गटाची सत्ता राहिली आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली आणि देगाव ग्रामपंचायत येते. ही दोन्हीही गावे मोठी असल्यने निकालाकडे लक्ष होते. या ठिकाणी आमदार महेश शिंदे गटाची सत्ता आली आहे. यामुळे आमदार शशिकांत शिंदे गटाला मानहानीकारक पराभवाला सामारे जावे लागले आहे.